ऊसतोड मजुराचा केज पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

केज : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या ऊसतोड मजुराने चक्क केज पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने येथील पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मोहन ढाकणे (रा. जोला ता. केज) असे आत्मदहन करणाऱ्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
पुष्पा ढाकणे आणि त्यांचे पती मोहन ढाकणे यांच्याकडे ट्रॅक्टर असून, ते साखर कारखान्यावर ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात. त्यांना दीड कोयते म्हणजे तीन ऊसतोड मजूर देतो, असे सांगून गावातीलच बाजीराव ढाकणे (रा. जोला ता. केज) याने पुष्पा व मोहन यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये घेतले. परंतु, त्या बदल्यात त्याने मजूर दिले नसल्याने ढाकणे पती-पत्नीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने पैसे परत दिले नाही. यामुळे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुष्पा ढाकणे व मोहन ढाकणे हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरून पोलिस ठाण्याच्या आवारात आले. त्याने ठाण्याजवळ दुचाकी उभी करून त्यातील पेट्रोल काढून अंगावर ओतून घेण्याच्या तयारीत असतानाच पोलिस निरीक्षक वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या चपळाईने मोहन ढाकणे याला ताब्यात घेत त्याला आत्मदहनापासून रोखले.






