द्रष्टा युवा उद्योजक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त…

राष्ट्रीय स्तरावरील ‘Outlook’ या प्रसिद्ध नियतकालिकाने ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे द्रष्टे’ (Visionaries of 5 trillion Economy) या विषयावर विशेषांक प्रसिद्ध केला. त्यात भारतातील दूरदृष्टीच्या उद्योजकांच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एस. जयशंकर, प्रख्यात उद्योगती नंदन नीलेकणी, अजय पिरामल, नवीन जिंदाल, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन इ. ५० नामवंताचा समावेश आहे. त्यामध्ये युवा साखर कारखानदार डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना स्थान देण्यात आले आहे. हे अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांच्या उद्योजकीय गुणांचे कौतुक करणाऱ्या मूळ इंग्रजी लेखाचे हे संपादित मराठी भाषांतर…. त्यांच्या २६ मार्च रोजीच्या वाढदिवसानिमित्ताने…

डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे २०१४ पासून उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष असून, आपल्या दूरदर्शी नेतृत्व गुणांमुळे त्यांनी यशाचा नवा मानदंड निर्माण केला आहे. तसेच शाश्वत पद्धतींचा वापर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या ‘पॅशन’मुळे त्यांनी उद्योग विश्व व जनमानसावर सकारात्मक प्रभावदेखील निर्माण केला आहे.

महाराष्ट्र हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊस उत्पादक राज्य असून, राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड (ता. खानापूर) हे साखर उद्योगातील मोठे नाव बनले आहे. २०११ मध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांनी या साखर कारखान्याची स्थापना केली. महाराष्ट्राच्या शिक्षण आणि साखर उद्योगात आपला ठसा उमटवणारे डॉ. कदम यांनी अवघ्या नऊ महिन्यांत या साखर कारखान्याची उभारणी करून, विक्रम प्रस्थापित केला आहे.

२०१२ मध्ये डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी केवळ उद्योगाच्या वृद्धीवर भर न देता, सर्व भागधारकांचे, विशेषतः शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते संगणक अभियांत्रिकीचे पदवीधर असून, मार्केटिंग आणि मानव संसाधन विषयात एमबीए, तसेच व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे. त्यांच्या या बहुआयामी कौशल्यामुळे ते उद्योगात नवनवीन प्रयोग करत आहेत.

डॉ. राहुल कदम यांना कृषी क्षेत्रातील अडचणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांची चांगली जाण आहे, कारण ते स्वतः कृषी कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार व उच्च कार्यक्षमतेसाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्यात ते अग्रेसर आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण साखर उद्योगात क्रांती घडत आहे.

१५ कोटी लिटर पाणी बचत
पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यातूनच भारतातील पहिले रोटरी पार्टिकल्स कलेक्टर (RPC) आणि १७० KLPD क्षमतेचे स्प्रे-ड्रायर प्रदूषण कमी करण्यासाठी साखर उद्योगात पहिल्यांदाच वापरण्याचे श्रेय डॉ. राहुल यांना जाते. तसेच, क्रॉम्प्रेस्‌ड पॉलिशिंग युनिट (CPU) साठी MBR-आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रति हंगाम १५ कोटी लिटर पाणी वाचवले जात आहे. ते म्हणतात, “जागतिक तापमानवाढीच्या काळात आपण अशा उपाययोजना केल्या पाहिजेत ज्या भविष्यातील पिढ्यांसाठी चांगले पर्यावरण निर्माण करू शकतील.”

एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कारखान्याच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली आहे आणि त्यांच्या सर्व उपक्रमांच्या यशामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते म्हणतात, “यश ही केवळ मैलाचे दगड गाठण्यापुरती मर्यादित गोष्ट नाही, तर नवीन मानदंड स्थापित करून नावीन्याच्या सीमा अधिक रूंदावत नेणे हे त्यामागचे खरे उद्दिष्ट असते.”

अनेक पुरस्कारांनी सन्मान
त्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, बायोमास प्रकल्पासाठी ग्रीन एनर्जी इंडिया पुरस्कार, सर्वोत्तम सह-उत्पादन विद्युत प्रकल्प पुरस्कार आणि सर्वोत्तम पर्यावरणपूरक कारखाना पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्योगातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ आणि ‘यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री’ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. तसेच, ‘Forty Under Forty 2024’ या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाल्यामुळे त्यांच्या क्षमतेची आणि उपलब्धींची साक्ष पटते.

रियल इस्टेट क्षेत्रातही नावलौकिक
डॉ. कदम यांचा व्यावसायिक दृष्टिकोन केवळ साखर उद्योगापुरता मर्यादित न राहता अन्न प्रक्रिया, इंधन, शिक्षण आणि स्थावर मालमत्ता यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. वाढत्या जीवनशैलीच्या अपेक्षा आणि अधिक चांगल्या कार्यानुभवाच्या मागणीमुळे त्यांनी रियल इस्टेट क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले आहेत. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण क्षेत्रातील त्यांची कटिबद्धता ‘डॉ. शिवाजीराव कदम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट’ (SKITM), इंदूरच्या स्थापनेतून दिसून येते. समाजाप्रति असलेली त्यांची सहानुभूती विविध परोपकारी कार्यांमध्ये प्रकट होते, जसे की शाळांना मदत करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे.

डॉ. राहुल कदम यांचे नेतृत्व, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन, शाश्वत विकासासाठी कटिबद्धता आणि स्थानिक लोकांना सक्षम करण्याच्या ध्येयामुळे ठळकपणे अधोरेखित होते. त्यांचे कार्य भारताच्या आत्मनिर्भरतेला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे योगदान ठरत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ‘पाच लाख ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थे’चे स्वप्न डॉ. राहुल कदम यांच्यासारख्या युवा उद्योजकामुळे पूर्ण होण्यास साह्यभूत ठरणारे आहे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »