‘अगस्ती’च्या उपाध्यक्षपदी सुनीताताई भांगरे
अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिवंगत अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांची निवड करण्यात आली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मिक निधनामुळे कारखान्याचे उपाध्यक्षपद रिक्त झाले होते.
अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला होता. या विजयात कै. अशोकराव भांगरे यांचा सिहाचा वाटा होता. त्यांच्यामुळे आदिवासी भागातून शेतकरी समृद्धी मंडळाला मोठे मताधिक्य मिळाले व या मंडळाला सर्व जागा जिंकता आल्या.
स्वतः भांगरे अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून निवडून आले. नंतर त्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर, दैनंदिन कामाकडे लक्ष देता यावे म्हणून ते शेंडी सोडून अकोले येथे रहायला आले होते. तालुक्याच्या आदिवासी भागात दोन लाख टन ऊस निर्मितीचे त्यांचे उद्दिष्ट होते. त्या प्रमाणे काम करण्यास त्यांनी सुरूवात केली होती. मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले.
उपाध्यक्ष निवडीसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्र भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक झाली. स्व. भांगरे यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीताताई यांना संधी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, आमदार किरण लहामटे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे आदी उपस्थित होते.