ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला मिळणार बळ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भीमाशंकर साखर शाळेसाठी २८ लाखांचा निधी; दोन नवीन वर्गखोल्या मंजूर

पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखर शाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि अपुरी जागा लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. या कामासाठी २८ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून प्रशासनाचे आभार मानले आहेत.


कारखाना गळीत हंगामासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर आपल्या मुलाबाळांसह कारखाना परिसरात स्थलांतरित होतात. या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी येथे साखर शाळा चालवली जाते. मात्र, पुरेशा वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना एकाच खोलीत दाटीवाटीने बसावे लागत होते, ज्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत होता. विवेक वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन या परिस्थितीची पाहणी केली होती आणि तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.


या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना स्वतंत्र, प्रशस्त आणि सुसज्ज वर्गखोल्या उपलब्ध होणार आहेत. मंजूर निधीतून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार असून, यामुळे ऊसतोड मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“आमची सामूहिक जबाबदारी”
याबाबत अधिक माहिती देताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, “ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »