शेतकरी मागतील तेवढा दर देऊ : डॉ. तानाजी सावंत
धाराशिव: तेरणा साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील अन्य कारखान्यापेक्षा ५१ रुपये प्रतिटन अधिकचा सर्वाधिक दर देण्यात येईल, तर त्यापुढील वर्षी शेतकरी मागतील तेवढा दर देऊ, अशी घोषणा भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना परिसरात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा स्नेह संवाद मेळावा मंगळवारी (दि. २४) उत्साहात संपन्न झाला.
यावेळी डॉ. सावंत म्हणाले, समुद्रे कुटुबियांनी पायात चप्पल न घालता तेरणा कारखाना कष्टातून उभा केला आहे. हा कारखाना ३३ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. तेरणा कारखाना २०२२ मध्येच भाडे करारावर घेतला असता पण तुम्हाला माहित आहे दिल्लीला कोण गेले? असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तेरणा कारखाना २५ वर्षांच्या भाडेकरारावर घेऊन तब्बल ३ लाख १२ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केला. परिसरातील इतर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव दिला.
येत्या हंगामात कारखाना ६ हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालवून १०० किलोमीटर अंतरावरील इतर कारखान्याच्या भावापेक्षा ५१ रुपये भाव जास्त देण्यात येईल. पुढील वर्षी १५ हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करून शेतकरी मागतील तो भाव देऊ, अशी घोषणाही ना. सावंत यांनी केली.
कारखाना विकत घेण्याचा अपप्रचाराच्या संदर्भात बोलताना तेरणा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचाच राहील असे म्हणत त्यांनी आई श्री तुळजाभवानीची शपथ घेतली. विरोधकांनी काय विकास केला असा प्रश्न करून ते म्हणाले, विकास काय असतो ते तुम्ही भूम, परंडा, वाशीला येऊन बघा. अनेक विकासकामे केली. उजनीचे पाणी आणण्याचे काम जवळपास ९८ टक्के पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळात मी मंत्री असतो तर माझा शेतकरी उजनीच्या पाण्यावर ऊसाला दारे देत असताना दिसला असता. भूम, परंडा, वाशी तालुक्यासाठी दीड हजार कोटीचा निधी आणला. संविधान बदलणार, मुस्लिम लोकांना बाहेर काढणार, अशा अफवा पसरवून विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. त्यामुळे काही बदलता येत नसते. केंद्र शासनाच्या विचाराचे सरकार राज्यात पाहिजे, तेव्हा आपणाला निधी मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच साथ द्यावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.