‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

ढोकी (उस्मानाबाद) : तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर सोमवारी भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा बँकेने ताबा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यापुढील काळात साखर कारखाना एकदाही बंद होणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात, त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी, त्यांच्या मुलांच्या हाताला काम, व्यापारी, दुकानदार आदीचे हित जोपासले जाईल अशी ग्वाही प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.
तेरणाचा ताबा घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती धनंजय सावंत, जिल्हा बँकेचे संचालक केशव सावंत, भैरवनाथ शुगरचे सर्व कर्मचारी, बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सूरज महाराज साळुंखे, तालुकाध्यक्ष अजित लाकाळ, गुणवंत देशमुख, माणिक काका वाकुरे, दत्ता तिवारी, अरुण डोलारे, ढोकीचे पोलिस पाटील राहुल वाकुरे, जिल्हा बँकेचे एमडी विजय गोणसे, विनोद लावंड आदी उपस्थित होते

तेरणा कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडून भैरवनाथ शुगरला दिला जाणार असल्याने, ढोकी व परिसरातील सुमारे पाच हजार शेतकरी, कर्मचारी येथे जमले होते. उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दंगल प्रतिरोधक दल व ढोकी पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी मिळून चोख बंदोबस्त ठेवला होता.
तेरणा साखर कारखाना व ट्वेंटीवन शुगर लातूर यांच्या वादातील न्यायालयीन निर्णय भैरवनाथ शुगरच्या बाजूने लागला. त्याचा रीतसर पंचनामा करून तेरणा साखर कारखाना सोमवारी भैरवनाथ शुगरकडे वर्ग करण्याची प्रक्रिया दिवसभर कारखाना कार्यस्थळावर पार पडली.
सकाळी दहा वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एमडी घोणसे पाटील, तसेच प्राधिकृत अधिकारी विनोद लावंड व त्यांचा सर्व स्टाफ कारखाना स्थळी दाखल झाला. त्यानंतर भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत, धनंजय सावंत, केशवराव सावंत व भैरवनाथ शुगरची सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झाली होती.
तेरणा सहकारी साखर कारखान्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्यात न्यायालयातीन लढाई सुरू होती. त्याचा निकाल सावंत यांच्या बाजूने लागला. त्यानंतर आज तेरणा कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगरकडे रीतसर सुपूर्द करण्यात आला.