चिमणीआडून मोठे राजकारण – रोहित पवार

सोलापूर : विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी आणि दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार पवार म्हणाले, काडादी घराण्याचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना चांगला दर दिला, काही दिवसांपूर्वी काढलेला मोर्चा कोणा एका नेत्याचा नव्हे, तर शेतकऱ्यांनी स्वत:हून काढलेला होता.
विमानसेवेला पर्याय असतानाही काही पुढारी कारखान्याच्या चिमणी पाडण्यावर टपले आहेत. त्यातून कोणाच्या खासगी कारखान्याला ऊस मिळेल, कोणत्या घराण्याचा फायदा होईल, याचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, सुधीर खरटमल, संतोष पवार, किसन जाधव, तौफिक शेख, सिद्धाराम चाकोते, प्रशांत बाबर, अजमल शेख, अयाज दिना, नजीब शेख आदी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर कारखान्याला चिमणीशिवाय पर्याय नाही, पण विमानसेवेला पर्याय असतानाही चिमणी पाडण्याचा हट्ट का, यामागे नेमके राजकारण कोण करतयं याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही कारखान्यासोबत व शेतकऱ्यांच्या बाजूंनी निश्चितपणे उभारू, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी सभासद असलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या जीवनात ५२ वर्षांपासून मोठे योगदान राहिले आहे. दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल असलेल्या सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांचे कल्याणच केले, असे सांगून पवार म्हणाले, “ अहमदनगरमध्ये ‘माळढोक’साठी सर्वाधिक क्षेत्र आरक्षित असतानाही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून फॉरेस्ट जागेचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडविला. पण, सोलापूरचा खासदार भाजपचा, आमदारही भाजपचेच अधिक, तरीदेखील बोरामणी विमानतळासाठी फॉरेस्ट जमिनीचा तिढा का सुटत नाही ?”
भाजप खासदाराने केंद्रात नेटाने प्रयत्न केल्यास निश्चितपणे बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.