शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इनोव्हाचे अनावरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

३५ कि. मी. मायलेज, इथेनॉल, पेट्रोल आणि बॅटरीवर चालणारी जगातील पहिली कार

नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. त्याची सुरुवात टोयोटा कंपनीने केली आहे. कंपनीच्या इनोव्हा गाडीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, २९ ऑगस्ट रोजी दिल्लीत अनावरण झाले.

ही गाडी पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्ही इंधनावर चालते. शिवाय इलेक्ट्रिक बॅटरीची सुविधाही त्यात आहे. त्यामुळे या गाडीचे मायलेज हायवेला ३५ कि. मी. प्रति लिटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचे नाव इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स फ्यूएल इनोव्हा असे ठेवण्यात आले आहे. कारण त्यात बॅटरी आहे आणि फ्लेक्स फ्यूएल म्हणजे पेट्रोल आणि इथेनॉलही आहे. एका बटनावर ती पेट्रोल किंवा इथेनॉलवर रूपांतरित होईल, असा दावा टोयोटा किर्लोस्कर कंपनीने केला आहे.
ही इनोव्हा ‘BS-6 (टप्पा II) ‘ पर्यावरणपूरक आहे.

या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी देखील उपस्थित होते, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे अधिकारीही उपस्थित होते.

“मला विश्वास आहे की भारत लवकरच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो-एलएनजी, बायो-सीएनजी आणि इतर पर्यायी इंधन वाहनांचे जगातील पहिले वाहन निर्मिती केंद्र बनेल. पर्यायी इंधनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण परिदृश्य बदलेल आणि यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता ते ऊर्जादाता बनणार, नसून विमानांसाठी जैव इंधन पुरवठादारही बनेल,’ असे उद्‌गार गडकरी यांनी काढले.

टोयोटाच्या निवेदनानुसार, टोयोटा इनोव्हाचे इथेनॉल-इंधनयुक्त प्रकार हे जगातील पहिले BS-VI (स्टेज-II) विद्युतीकृत फ्लेक्स-इंधन वाहन असेल. गेल्या वर्षी, गडकरींनी टोयोटा मिराई ईव्ही सादर केली, जी पूर्णपणे हायड्रोजन-निर्मित विजेवर चालते.

ही गाडी बाजारात कधी येणार, याची घोषणा मात्र कंपनीने अद्याप केलेली नाही.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »