ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना अनुदानित दरात ऊस रोपांचे वितरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परभणी : येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत ३ लाख रोपांचे वाटप करण्यात आले असून, पुणे येथील ‘अजंता एक्झॉटिका’ संस्थेच्या मदतीने ही गुणवत्तापूर्ण रोपे तयार केली जात आहेत.

बाजारात ऊस रोपांचे दर साधारणपणे अडीच ते साडेतीन रुपये असताना ट्वेंटीवन शुगर्सने प्रति रोप ३० पैसे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे कारखान्याच्या १०० किमी परिघातील शेतकऱ्यांना रोपे २.२० रुपयांत शेतावर पोच देण्यात आली आहेत. तसेच स्वतःच्या वाहनाने रोपे नेणाऱ्या शेतकऱ्यांना ही रोपे १.८० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून आणलेल्या मूलभूत बेण्यापासून ही रोपे तयार करण्यात येत असल्याने ती कीड-रोगमुक्त व अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध आहेत. कारखान्याकडे या रोपांचे अधिकृत बियाणे स्त्रोत प्रमाणपत्र उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना खात्री-शीर व दर्जेदार बेणे मिळत आहे.

रोप पद्धतीने ऊस लागवड केल्यास उसाची जाडी व वजन वाढून एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तसेच पारंपारिक लागवडीच्या तुलनेत बेण्याचा व मजुरीचा मोठा खर्चही वाचतो. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेला हा मराठवाड्यातील पथदर्शी उपक्रम ठरत असून दर्जेदार ऊस रोपे अल्प दरात उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »