भावजयीचा पाहुणचार

मायबाप गेले वर्षे झाली बारा|
भावाला सारे आठवे तेव्हा जरा ||
मोठी बहीण आली नाही माहेरा|
भावाने पहाटे जोडला खटारा||१||
सूर्य उगवला बहिणीच्या घरी |
ताई एक रात चाल ना माहेरी||
भाऊ बहीणीला विनवणी करी|
सांजेला पोहोचले भावाच्या घरी||२||
मग बंधुराया सांगे बायकोला|
चांगलं न्हाऊधुऊ घाल ताईला||
ती सांगते पतिदेवाला जोरात|
खोबरेल तेल नाही ना घरात||३||
बंधु बोले घाल बहिणीला जेऊ|
टोपल्यातल्या शिळ्या भाकरी खाऊ||
पोळ्या कडक एकही नाही मऊ|
उद्याला काही चांगला बेत ठेऊ||४||
बंधु सांगे वाढ बहिणीला दुध|
वासरू प्यायलं नव्हती ना सुद||
बंधु सांगे वाढ बहिणीला दही|
कालपासून इरजणंच नही||५||
साडीसाठी भावजय मारी हाका|
भारी नको, बांगड्याला पैका राखा||
घेऊ सोलापूरी बांडांच लुगडं|
तिथलं दुकान नव्हतं उघडं ||६||
बंधु म्हणाले ताईची भरा ओटी|
राया घरात शिल्लक नाही वाटी||
बंधु सांगे लावा बहिणीला वाटी|
देवा चमक भरली माझ्या पाठी||७||
बहिण भावाचे प्रेम नाही खोटे|
भावजयीची का आडकाठी वाटे||
घ्यावा आदर्श सुभद्रा रूक्मिणीचा|
दोघे स्वीकार करा ताई दादाचा||८||
||रघुनंदन नाशिक ||