अमळनेरच्या ऊसतोड मजुरांची सुटका

जनसाहस संस्थेचा पुढाकार
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पळासदडे आणि हिंगोणे गावांतील आठ ऊसतोड मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जबरदस्तीने कामाला लावण्यात आले होते. मजुरी न देता त्यांना उपाशी ठेवण्यात आले आणि धमकावून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची माहिती जनसाहस संस्थेच्या हेल्पलाईनवर मिळताच संस्थेने जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून कारवाई सुरू केली. दौंड तालुका प्रांत अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी बंधपत्रित मजुरीविरोधी कायद्याअंतर्गत मजुरांचे जबाब नोंदवून घेतले आणि त्यांची सुटका केली.
जनसाहस संस्थेचे अॅड. विरसेन काजळे, रुबिना सय्यद, बाळासाहेब शिंदे, नीलेश शिंदे, सोनम बिऱ्हाडे, प्रज्ञा हातोडे आणि सागर कलशेट्टी यांनी मजुरांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यात मदत केली.
सुटलेले मजूर:
हिलाल बन्सी मोरे
सुशीलाबाई हिलाल मोरे
सुनील पंडित सोनवणे
भारती सुनील सोनवणे
राकेश हिलाल मोरे
वैष्णवी सुनील सोनवणे
आयुष सुनील सोनवणे
गायत्री सुनील सोनवणे
ही कारवाई मजुरांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचे उदाहरण ठरली.





