दुबई परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक : पाटील

पुणे : जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत होत असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होत आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
दुबई येथे १० ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नववी दुबई साखर परिषद पार पडली. त्याच्या उद्घाटन सत्रात पाटील बोलत होते. परिषदेमध्ये भारताच्या ‘मांजरा साखर’ परिवाराचे अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील- ठाकरे, निहार ठाकरे, एनएफसीएसएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
दुबई शुगर परिषदेमध्ये डिजिटल शेती, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार, पाण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवल जमवणे, साखरेच्या आरोग्यासंदर्भातील चुकीच्या अफवा, तापमान वाढीची चिंता या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन चांगले मुद्दे समोर येतील. जागतिक तापमान हे एक अंश पेक्षा अधिक वाढलेले आहे. त्याचा पर्यावरणावर आणखी परिणाम होईल, साखर उद्योगाने भविष्यातील नियोजन करताना हे गृहित धरले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.