253 हार्वेस्टरचे लाभार्थ्यांना वितरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या हार्वेस्टर अनुदान योजनेअंतर्गत आजतागायत २५३ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी पूर्ण होऊन त्याचे संबंधितांना वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

या योजनेअंतर्गत एकूण नऊशेवर हार्वेस्टर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली; मात्र यंत्रांची किंमत प्रचंड असल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असे निदर्शनास आले आहे. प्रारंभी अर्ज तर मोठ्या प्रमाणावर आले होते, मात्र छाननी आणि लॉटरी प्रक्रियेनंतर योजनेमध्ये रस दाखवणाऱ्यांची संख्या समाधानकारक दिसली नाही. त्यामुळे ही योजना दोन वर्षांपासून रखडत – रखडत सुरू राहिली.

यासंदर्भात साखर आयुक्त डॉ. खेमनार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, ‘‘या योजनेचा साखर कारखान्यांव्यतिरिक्त अन्य संस्था आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ झाला पाहिजे या उद्देशाने कोटा निश्चित करण्यात आला होता. परंतु हा कोटा पूर्ण होताना दिसत नाही. आतापर्यंत २२३ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी या योजनेअंतर्गत पूर्ण झाली आहे आणि उर्वरित ३० यंत्रांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत या टप्प्यातील खरेदी पूर्ण झालेली असेल.’’

ऊसतोडणीसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर बनल्याने हार्वेस्टर यंत्रांद्वारे तोडणी करून या समस्येवर काही प्रमाणात मात करण्याच्या उद्देशाने हार्वेस्टर अनुदान योजना जाहीर करण्यात आली. अधिकतम ३५ लाख रुपये किंवा यंत्राच्या किमतीच्या ४० टक्के अनुदान या योजनेद्वारे देण्यात येते.

यंत्राच्या किमती जीएसटीसह एक कोटीच्या घरात आहेत. त्या ऊस उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक संस्थांच्या आवाक्यात येत नाहीत तोपर्यंत यंत्रांद्वारे ऊसतोडणीचे उद्दिष्ट पूर्ण होणारे नाही. त्यासाठी या क्षेत्रात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. काही देशी कंपन्यांनी यात चांगली कामगिरी केली आहे; परंतु अशा यंत्रांची कार्यक्षमता अपेक्षेएवढी नाही.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »