आजारी कर्मचाऱ्याच्या मदतीला धावला ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’

पुणे : साखर उद्योगात काम करणारा आपला एक सहकारी आजारी पडला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, हे समजताच ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ त्याच्या मदतीसाठी धावला आणि भरीव आर्थिक मदत गोळा झाली. या घटनेतून मानवी संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा आला.
ओंकार बाजीराव जाधव हे श्री सुभाष शुगर प्रा. लि. मध्ये ऑलिव्हर मेट हुद्यावर हंगामी तत्त्वावर सेवेत आहेत. ते आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंब चिंतेत होते. त्यांच्या आजारपणाची आणि आर्थिक परिस्थितीची माहिती ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ ला समजली आणि त्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यासाठी श्री. दिलीप वारे यांनी पुढाकार घेतला.
शुगर इंडस्ट्रीज परिवार हा साखर क्षेत्रात काम करणाऱ्या सुहृदयी मित्रांचा ग्रुप आहे. या परिवाराने व्हॉट्सअपवरून आर्थिक मदतीचे आवाहन करताच, मदतीचा ओघ सुरू झाला. दीड दिवसात २५ हजारांची मदत ओंकार यांच्या थेट खात्यात जमा झाली. त्यामुळे त्यांना अडचणीच्या काळात मोठी मदत झाली. ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ मदतीला धावून आल्याबद्दल जाधव यांनी ग्रुपचे आभार मानले. ‘आपल्या मदतीचे मोल मी करूच शकत नाही, मी आपणा सर्वांचा ऋणी आहे’, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
‘शुगर इंडस्ट्रीज परिवारा’ने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून, अत्यंत कमी वेळात आपल्या सहकाऱ्याला मदतीचा हात पुढे करून सर्वांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.