नागपूर, जालन्यात ऊस विकास संस्था सुरू होणार

औरंगाबाद : देशातील प्रमुख ऊस संशोधन संस्था भारतीय ऊस विकास संशोधन संस्थेची (आयआयएसआर) दोन केंद्रे मराठवाड्यात जालना आणि विदर्भात नागपूर जवळ होणार आहेत.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या 62 व्या दीक्षांत समारंभात ही माहिती दिली.
शरद पवार म्हणाले की, जालन्याजवळ हाणाऱ्या या नव्या केंद्रासाठी सुमारे 100 एकर जमीन संपादित करण्यात आली असून येत्या सहा महिन्यांत या केंद्राचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मी देशभरात ऊस संशोधनात गुंतलेल्या संस्थेचा प्रमुख आहे. जेव्हा मी विकासाचा विचार करतो तेव्हा मराठवाडा नेहमी माझ्या मनात असतो.”
संस्थेचे आणखी एक केंद्र नागपुरात उभारले जाईल, जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने जमीन संपादित केली गेली. त्याचे काम सुरू झाले आहे. कमी पाण्यात ऊसाची लागवड कशी करता येईल, तसेच नवीन वाण कसे काढता येईल यावर केंद्राकडून संशोधन केले जाईल आणि शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य मिळेल, असे पवार यांनी सांगितले.
‘आयआयएसआर’ चे मुख्यालय लखनौ येथे आहे. ऊस संशोधन करणारी देशातील ही प्रमुख संस्था आहे.
सुशिक्षित समाजाची स्थापना करताना मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले होते. डॉ. आंबेडकरांनी ही भावना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केली. त्यामुळे येथे विद्यापीठाची स्थापना झाली. या दोन्ही नेत्यांचे क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.
यावेळी नितीन गडकरी यांचेही भाषण झाले. पवार आणि गडकरी यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डि.लिट. पदवी देऊन गौरवण्यात आले.