यंदा साखर उत्पादन सात टक्क्यांनी घटणार?
निर्यातीवर परिणाम शक्य
नवी दिल्ली : लहरी हवामानाचा फटका ऊस पिकाला बसल्याने, यावर्षी साखरेचे उत्पादन सात टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असे शेतकरी, कारखानदार आणि व्यापाऱ्यांना वाटते.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताकडून यंदा साखरेची कमी निर्यात झाल्यास, जागतिक बाजारपेठेतील दर वाढू शकतात आणि त्याचा लाभ प्रतिस्पर्धी ब्राझील आणि थायलंड घेऊ शकतात, असे तज्ज्ञांना वाटते.
“पीक गेल्या वर्षीसारखे दिसत होते; पण जेव्हा आम्ही कोयता लावला, तेव्हा आम्हाला जाणवले की यंदा आमचे उत्पादन बरेच घटणार आहे,” असे सोलापूर जिल्ह्यातील ऊस शेतकरी प्रदीप जगताप यांनी सांगितले. या वर्षी जगताप यांच्या नऊ एकर फडातून ५३० टन ऊस उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच फडात ते ७५० टन उत्पादन झाले होते.
जगताप यांच्याप्रमाणेच, महाराष्ट्रातील 11 प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांतील इतर 192 शेतकऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, उन्हाळ्यात दीर्घकाळ कोरडे हवामान आणि नंतर अतिवृष्टीमुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे.
कोल्हापुरातील शेतकरी बबन करपे म्हणाले, “उन्हाळा कडक होता आणि त्यानंतर जुलैपासून खूप पाऊस झाला. शेत जलमय झाले होते आणि पिकाला बराच काळ सूर्यप्रकाश मिळाला नाही.”
यंदा उसाच्या उत्पादनात सरासरी 15% घट दिसून येत आहे, परंतु काही भागांमध्ये, प्रति हेक्टर ३५ टक्के नुकसान 35% असेल, असे करपे म्हणाले.
देशातील साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त वाटा असलेल्या महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू विपणन वर्षात विक्रमी 13.8 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन अपेक्षित होते, ते गेल्या वर्षीच्या हंगामात 13.7 दशलक्ष टन होते.
परंतु ऊस उत्पादनात 15% घट झाल्यामुळे महाराष्ट्राचे साखर उत्पादन 11.7 दशलक्ष टनांपर्यंत खाली येऊ शकते, असे साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी आणि ट्रेड हाऊसच्या डीलरने सांगितले. दोघांनीही नाव सांगण्यास नकार दिला. कारण त्यांना माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही.
महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादकांनाही प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. परिणामी, 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन 6 दशलक्ष टनांच्या तुलनेत यावर्षी कर्नाटकचे साखरेचे उत्पादन 5.5 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेचे कमी उत्पादन होणार असल्याने, चालू 2022-23 वर्षात भारताचे एकूण साखर उत्पादन 33.3 दशलक्ष टनांपर्यंत खाली येऊ शकते, जे गेल्या वर्षीच्या विक्रमी 35.8 दशलक्ष टनांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी ठरेल, असे साखर कारखानदारांना वाटते.
केंद्र सरकारने कारखान्यांना पहिल्या टप्प्यात 6.15 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे आणि ‘इस्मा’ला (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) अशा आहे की, दुसऱ्या टप्प्यात 4 दशलक्ष टन साखरेची निर्यात करायला परवानगी मिळेल.
पण उत्पादनात घट झाल्याने, सरकार स्थानिक बाजारपेठेतील मुबलक साखर साठा आधी सुनिश्चत करेल आणि अंदाज घेऊन दुसऱ्या टप्प्याला परवानगी देईल. पण ती अपेक्षेपेक्षा कमीच राहील, असा अंदाज आहे. स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी 27.5 दशलक्ष टन साठा सुनिश्चित केला जाईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
COURTSEY – REUTERS