‘राजाराम’ची निवडणूक जाहीर, २३ एप्रिलला मतदान, २५ ला निकाल

कोल्हापूर – संपूर्ण साखर क्षत्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीची घोषणा अखेर झाली.
नव्या संचालक मंडळासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला असेल. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
माजी आमदार अमल महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्यामध्ये या निवडणुकीत राजकीय टक्कर पाहायला मिळेल.
राज्य सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली; पण कोरोनामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या होत्या. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर गेल्या वर्षी या कारखान्याची निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला.
मात्र प्रक़रण सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्याने निवडणुका लांबल्या.
कारखान्याची अंतिम मतदार यादी ९ मार्चला प्रसिद्ध झाली. त्याचदिवशी या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता.
- असा आहे कारखाना
- स्थापना- १९३८,
- संचालक- २१
- कार्यक्षेत्रातील गावे- १२२
- अ वर्ग सभासद- १३ हजार ४०९
- ब वर्ग सभासद- १२९
- एकूण- १३ हजार ५३८
- निवडणूक कार्यक्रमः
- अर्ज भरण्याची प्रक्रिया – २० ते २७ मार्च २०२३
- अर्जांची छाननी- २८ मार्च २०२३
- अर्ज माघारी घेण्याचा कालावधी- २९ मार्च ते १२ एप्रिल २०२३
- मतदान- २३ एप्रिल
- निकाल – २५ एप्रिल