बांध कोरण्यातील आनंद!

–शेखर गायकवाड
महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून सहज भरार्या मारतात, त्यांचे खुमासदार सदर ‘प्रशासकीय रंगढंग’ खास ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी….

निवृत्ती नावाचा एक शेतकरी गावातील आपली तीन ठिकाणी असणारी तुकड्या तुकड्यातील जमीन कसत होता. एका ठिकाणी त्याची पाच एकर जमीन होती तर दुसर्या एका ठिकाणी दोन एकर आणि एका ठिकाणी अडीच एकर जमीन होती. तो ज्या वाडीवर राहत होता त्या वाडीवर सगळे त्याचेच भाऊबंद राहत होते. पिढ्यान पिढ्या सर्व जण एकमेकांना धरून असत आणि सुखदुःखात एकमेकांना मदत करीत असत.
निवृत्तीची अडीच एकर जी जमीन होती ती जरा राहण्याच्या ठिकाणापासून लांब होती. त्याच्या शेजारी आनंद नावाच्या शेतकर्याची जमीन होती. निवृत्तीची मुले कष्ट करून चांगली पिके घेत होती. त्याला उत्पन्न सुद्धा चांगले मिळत होते.
आनंदचा मुलगा जरा आळशी होता आणि शेतातले काम त्याला नको वाटत होते. हळूहळू निवृत्तीची प्रगती होत आहे हे पाहून मनातून आनंदला फारसे चांगले वाटत नव्हते. कधी कधी निवृत्तीच्या शेतमजूर गड्याला जास्त पगाराचे आमिष दाखवून तर कधीही तासन् तास त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने गप्पा मारायला बोलावून त्याच्या कामात खोळंबा कसा होईल, यामध्ये आनंदला अधिक आनंद मिळू लागला.
अनेक वेळा आनंद हा निवृत्तीच्या शेतमजुराला तुझा मालक वेळेवर पगार देतो का, मी तुला त्याच्यापेक्षा जास्त पगार देतो, तू माझ्याकडे कामाला येतोस का, निवृत्तीची मुलं तुझ्याबरोबर चांगली बोलतात का, एवढं कष्ट कशाला करतोस, तुला काय मालक बक्षीस देणार आहे का, अशी विचारणा करीत असे. त्यावर निवृत्तीचा शेतमजूर काहीबाही उत्तर देऊन वेळ मारून नेत असे. प्रत्येक खरीप हंगामाच्या सुरुवातीला नांगरट करताना आनंद हा निवृत्तीच्या जमिनीचा बांध थोडा थोडा कोरायला लागला.
निवृत्तीच्या शेतमजुराला आनंद हे जाणीवपूर्वक करतोय, असे वाटले नाही. कारण तो दररोजच त्याच्या संपर्कात होता. एक दिवस जेव्हा निवृत्ती शेतात चक्कर मारायला आला तेव्हा तो शेतमजुराला फार बोलला.
या आनंदने नांगरट करताना सरळ नांगरट केलेली नाही. शिवाय आपला बांध पण तिरका दिसतो आहे, तो तुला कसा दिसला नाही, अशी विचारणा केली. त्यावर सुरुवातीला निवृत्तीचा गडी म्हणाला बैलाने नांगरट करताना थोडाफार बांध इकडे तिकडे होतो. निवृत्तीने त्यानंतर गड्याला खडसावून सांगितले, की मला आनंदाने जाणीवपूर्वक बांध कोरत असल्याचे वाटते.
एकदा निवृत्ती आणि आनंद यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तुझा जमिनीचा बांध अलीकडे आला कसा, अशी विचारणा केली असता आनंदकडे त्याबद्दल कोणतेही उत्तर नव्हते. दोन जमिनींच्या बांधाच्या मध्ये किती अंतर असते व किती रुंदीचा बांध असतो याचे सरकारकडे कुठेतरी रेकॉर्ड असणार, असा आनंदचा समज होता.
शेवटी तो ऐकत नाही असे पाहिल्यावर निवृत्तीने एकदाचे बांध कोरण्याबद्दल जमीन महसूल कायद्याखाली वकिलामार्फत नोटीस देऊन रीतसर बांध निश्चित करण्याची केस दाखल केली. या केसमध्ये दोन जमिनींच्या मध्ये बांधाची रुंदी किती असावी व कायद्यामध्ये लिहिलेले असताना माझ्या शेजार्यांनी बांध कोरून ही रुंदी कशी कमी केली आहे, याचा स्पष्ट उल्लेख होता, त्या दिवशी पहिल्यांदा नोटीस हातात पडल्यावर आनंदला जमिनीच्या बांधाची रुंदी ही पण कायद्यामध्ये दिलेली आहे हे समजले. एवढेच नाही तर बांधासाठी शेताचा जेवढा भाग जातो त्यामध्ये दोन्ही शेजारी असलेल्या शेतकर्यांचा अर्धा अर्धा हिस्सा असतो हे पण लक्षात आले.
बांधाचा जो वरंबा आहे त्या वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सारख्याच रुंदीचा बांध असला पाहिजे व तो बांध आनंदने त्याच्या बाजूने कोरलेला असल्याचे स्पष्टपणे पंचनामांमध्ये निदर्शनास आले. प्रांताधिकारी यांनी जमीन महसूल कायद्यामध्ये दोन जमिनी मध्ये बांध खालील रुंदीचे असल्याची गोष्ट स्पष्टपणे आपल्या निकालपत्रात लिहिली होती.
त्यानुसार पुन्हा बांध तयार करण्यासाठी येणार्या खर्चापोटी आनंदने निवृत्तीला पाच हजार रुपये एवढी नुकसान भरपाई द्यावी व बांध पुन्हा तयार करावे, असे जेव्हा आदेश केले, तेव्हा आनंदचा हा परमानंद संपुष्टात आला होता.
बांध कोरण्याची ही वृत्ती सातत्याने शेतकरी समाजात निदर्शनास आली आहे. स्वतःची 15 एकर जमीन पडीक ठेवून सहा इंचाचा बांध कोरून काय आनंद मिळतो, याचा शास्त्रीय अभ्यास करायला अजून किती दशके लागतील हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही.
असा असतो बांध…
कोरडवाहू जमीन -0.46 मी. रुंद, 0.61 मी. उंच
भाताची व बागायत जमीन- 0.23 मी. रुंद, 0.61 मी. उंच
धुरा व सरबांध -1.22 मी. रुंद, 0.61 मी. उंच