विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

अहिल्यानगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या सहकार क्षेत्रात ढवळाढवळ न करण्याची भूमिका घेतल्याने निवडणुका बिनविरोध होत आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा होईल. १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर होईल आणि २९ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर बिनविरोधची औपचारिक घोषणा होईल.
वेळापत्रकांनुसार विखे पाटील कारखान्याचे मतदान ९ मे रोजी, तर निकाल १० मे रोजी आहे. तसेच थोरात कारखान्यासाठी मतदान ११ मे रोजी आणि निकाल १२ मे रोजी आहे. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या या निवडणुकीत मात्र राजकीय संघर्ष टळला आहे..
राज्याच्या राजकारणात मात्तब्बर कुटुंबे म्हणून थोरात आणि विखे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र विखेंचा लोकसभेतील पराभव व थोरातांचा विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही कुटुंबांतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात त्याचे पुढे परिणाम दिसत गेले.