‘श्रीनाथ’ची गरूडझेप कौतुकास्पद : सुबोध कुमार

केंद्रीय अति. सचिवांची कारखान्याला भेट, विविध प्रकल्पांची पाहणी
पुणे : केंद्र सरकारच्या साखर विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोध कुमार सिंग व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 18 एप्रिल रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यास भेट दिली.
सिंग यांनी प्रगतशील शेतकरी तानाजी मेमाणे (मु. मेमाणेवाडी, टाकळी भीमा, ता. दौंड जि पुणे) यांच्या शेतात जाऊन उसाची पाहणी केली. मेमाणे यांचे आडसाली ऊस क्षेत्र ६ एकर असून, ऊस वाण को ८६०३२ आहे.
सुबोध कुमार सिंग यांनी प्रती हेक्टर आडसाली, पूर्व हंगामी, सुरू व खोडवा ऊस उत्पादन संदर्भात माहिती घेत उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर रासायनिक खतांवरील वाढता खर्च कमी करण्याकरिता कमी खर्चात जास्त उत्पादन, जमिनीचा पोत सुधारण्याकरिता सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, सेंद्रिय खत म्हणून कारखान्याच्या कंपोस्ट खतांचा वापर करणे. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर व त्यास मिळणारे शासनाचे अनुदान, माती परीक्षण आदी विषयांवरही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
ऊसतोडणी ते ऊस गाळप कालावधी (कट टू क्रश) कमी करण्यासाठी प्रत्येक कारखान्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करावा, असे त्यांनी सुचवले.
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर सुबोध कुमार सिंग व शेखर गायकवाड यांनी कारखान्याचे CBG प्रकल्प, सध्याचा डिस्टिलरी प्रकल्प, नवीन उभारणी होणारा डिस्टिलरी प्रकल्प, 2G ईथेनॉल प्रकल्प , CO२ प्रकल्प, साखर कारखाना ई प्रकल्पास भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी, कारखान्याचे विविध प्रकल्पांची माहिती दिली.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत म्हणाले की, कारखाना चालवताना आम्ही काळानुरूप वेळोवेळी बदल करत मार्गक्रमण करीत आहोत. त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

सुबोध कुमार म्हणाले, ‘श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने कमी कालावधीत घेतलेली गरुडझेप नक्कीच कौतुकास्पद आहे. एकाच ठिकाणी साखर व साखर उद्योगाशी निगडित उत्पादन देणारे सर्व प्लांट आहेत व ते योग्य प्रकारे सुरू आहेत याचा आनंद आहे. भाविष्याचा विचार करत प्रत्येक प्रकल्पाची उभारणी आहे. त्याच बरोबर कारखाना ऊस विकासाकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे ही खूप चांगली बाब आहे.
यावेळी प्रादेशिक साखर सह संचालक संजय गोंदे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष व नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, कारखान्याचे संचालक किसन शिंदे, माधव राऊत, भगवान मेमाणे, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी अशोक शेंडगे, ऊस विकास अधिकारी दीपक रोडे, तसेच एकरी १०० टन ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी तानाजी मेमाणे, भगवान मेमाणे, राजेंद्र मेमाणे, किसन शिंदे, निखील मेमाणे आणि शेतकरी उपस्थित होते.