खासगी वजनकाट्यांवर तोललेला ऊस स्वीकारणे बंधनकारक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अन्यथा कारवाई होणार – साखर आयुक्तांचा आदेश
‘शुगर टुडे’ची बातमी खरी ठरली

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील संबंधित साखर कारखान्याऐवजी खासगी शासनमान्य प्रमाणित वजन काट्यावर तोललेला ऊस स्वीकारणे यापुढे बंधनकारक ठरणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी गुरुवारी (१० नोव्हेंबर) जारी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

याखेरीज वजनकाट्यांबाबत साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध भूमिकांचा आणि कृतींचा अनुचित प्रथा म्हणून उल्लेख करून, यासंदर्भात तक्रारी आल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून संबंधित कारखान्याविरुद्ध कारवाई करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही आयुक्तांनी या परिपत्रकाद्वारे दिला आहे.

Ravindra Singhal IPS
Dr. Ravindra Singhal IPS, Addl Commissioner, Controller, Weights and Measures Department.

साखर उद्योग क्षेत्रातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या आणि अल्पावधीत या क्षेत्राचे माहिती व्यासपीठ बनलेल्या ‘शुगर टुडे’ (SugarToday) ने सर्वात आधी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. लवकरच आदेश जारी होणार, असे वृत्तात म्हटले होते. हे वृत्त सकाळी प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारच्या सत्रात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी परिपत्रक जारी करून वजनकाट्यांबाबत उपस्थित झालेले अनेक प्रश्न निकाली काढले आहेत.

(या बातमीसोबत परिपत्रकाची प्रत देण्यात आली आहे. त्यासाठी या लिंकला क्लिक करा)

आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की वैधमापन विभागाचे राज्याचे प्रमुख म्हणजे अतिरिक्त पोलिस महासंचालक व नियंत्रक यांना २३ सप्टेंबर २०२२ रोजी साखर आयुक्तालयाने वजनकाट्यांबाबत पत्र लिहिले होते. त्यांचा अहवाल २ नोव्हेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. साखर कारखान्यांचे वजनकाटे असो की खासगी वजनकाटे, दोन्हींसाठी एकसमान कार्यपद्धती आहे, त्यामुळे खासगी वजन काट्यांबाबत कारखान्यांनी संशय व्यक्त करणे अनुचित आहे, दोन्हींबाबत कॅलिब्रेशन आणि प्रमाणीकरणासाठी वैधमापन शास्त्र नियम २०११ मध्ये विहित केलेली एकसमान पद्धती वापरली जाते आदी मुद्दे अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

या अहवालाचा अभ्यास करून, साखर आयुक्त गायकवाड यांनी वरील परिपत्रक जारी केले. त्यातील महत्त्वाचा तपशील थोडक्यात असा…
खासगी वजन काटे आणि कारखान्यांकडील वजन काटे हे दोन्ही वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केलेले वजन काटे असल्यामुळे त्यावरील वजन ग्राह्य धरणे अपेक्षित आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या वजन काट्यांसंदर्भात पारदर्शकता येण्याकरिता व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात उसाच्या वजनाबाबत कोणतीही शंका उद्‌भवू नये म्हणून साखर कारखान्यांची खालील कृती ही अनुचित प्रथा म्हणून समजण्यात येईल.

  • १. खासगी वजन काट्यावर वजन केल्यास शेतकऱ्यांचा ऊस नाकारणे
  • २. खासगी वजन काट्यावर वजन करून आणल्यास शेतकरी, वाहनचालक, मुकादम यांच्याविरुद्ध साखर कारखान्याने करवाई करणे
  • ३. खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस वाहणाऱ्या वाहनांचा क्रम जाणीवपूर्वक डावलणे
  • ४. खासगी वजन काट्यांवर ऊस मोजणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावणे
  • ५. खासगी वजन काट्यावर वजन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाची पुढील वर्षी नोंदणी न करणे
  • ६. खासगी वजन काट्यांवर ऊस तोलणाऱ्या शेतकऱ्यांचे कारखान्याचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न करणे
  • ७. खासगी वजन काट्यावरील वजन आणि कारखाना काट्यावरील उसाचे वजन यामध्ये तफावत येणे

१ ते ६ पैकी कोणतीही कृती साखर कारखान्याने केल्यास, त्याबाबत संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे विहित नमुन्यात तक्रार दाखल करता येईल.

क्रमांक ७ बाबतची तक्रार वैधमापन शास्त्र विभागाच्या संबंधित जिल्हा उपनियंत्रकांकडे विहित नमुन्यात करता येईल.
प्रादेशिक साखर सहसंचालक हे संबंधित तक्रारदार शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधींची सुनावणी घेऊन उचित निर्णय देतील.

क्रमांक ७ बाबतच्या तक्रारीविषयी संबंधित जिल्हा वैधमापन उपनियंत्रक नियमानुसार अंतिम कार्यवाही करतील आणि संबंधित तक्रारदारास कळवतील.

‘शुगर टुडे’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

News Cutting Sugar Today

‘सरकारमान्य कोणताही वजनकाटा ग्राह्य धरण्याची शक्यता’, असे वृत्त सर्व माध्यमांच्या आधी ‘शुगर टुडे’ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले. वजनकाट्यांसदर्भातील तक्रारींची साखर आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन, सर्व कारखान्यांना आदेश जारी केले आहेत. याबाबत सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे ऊस उत्पादकांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

परिपत्रकामध्ये ‘बंधनकारक’ हा शब्द वापरला नसला, तरी खासगी वजन काट्यावरील ऊस न स्वीकारणे अनुचित ठरवल्याने साखर आयुक्तांचा आदेश ‘बंधनकारक’च राहणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा
Select Language »