एमडी इच्छुक त्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

४ मे रोजीच्या मुख्य परीक्षेस बसण्यास अनुमती

पुणे : सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित कार्यकारी संचालकांच्या (एमडी) पॅनलमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा असलेल्या कथित ‘अपात्र’ उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या ४ मे २०२३ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसण्याची मुभा कोर्टाने त्यांना दिली आहे.

संभाव्य पॅनलसाठी निश्चित केलेल्या पात्रता अटींमध्ये बसत नसल्याच्या कारणावरून ४० उमेवारांना संबंधित निवड समितीने अपात्र ठरवले होते. त्याला या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात पाच वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान दिले. मात्र १२ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढताना, संबंधित उमेदवारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला संबंधित उमेदवारांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि एमडी पॅनलसाठी होत असलेल्या ४ मे २०२३ च्या मुख्य परीक्षेसाठी बसण्याची अनुमती मागितली.

अरविंद महादेव ढेकणे आणि इतरांनी दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह टू अपीलवर (विशेष याचिका) २८ एप्रिल रोजी न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

४ मे २०२३ रोजी वैकुंठ मेहता संस्थेमार्फत होत असलेल्या मुख्य परीक्षेला अर्जदार उमेदवारांना बसू द्यावे, मात्र या याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित अर्जदार उमेदवारांचे निकाल जाहीर करू नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) दिला. तसेच प्रतिवादी साखर आयुक्तालय आणि इतर संबंधितांना नोटिसा जारी करण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला. या नोटिसांना चार आठवड्याच्या आत उत्तर द्यायचे आहे.

सुप्रीम कोर्टात अर्जदारांची बाजू विधिज्ञ प्रशांत केंजळे आणि विधिज्ञ निशांत काटनेश्वरकर यांनी मांडली. या हंगामी निकालानंतर विधिज्ञ केंजळे यांनी साखर आयुक्तालयाला पत्र लिहून सर्व अर्जदार उमेदवारांना ४ मे रोजीच्या परीक्षेस बसू देण्याबाबत कळवले आहे.

सुप्रीम कोर्टात अपील करणारे अर्जदार आणि प्राथमिक परीक्षेत ९२ गुण मिळवणारे अरविंद ढेकणे ‘शुगरटुडे’शी बोलताना म्हणाले की, हायकोर्टाचा निर्णय आम्हाला न पटल्याने, आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि तेथे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही पात्रतेच्या अटींमध्ये पूर्णपणे बसतो. असे असतानाही आम्हाला डावलण्यात आल्याने आम्हाला कोर्टाचे दार ठोठवावे लागले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »