देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

पुणे : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १९४ साखर कारखान्यांचा समावेश आहे. कर्नाटकात सर्व ७२, तर उत्तर प्रदेशात ६५ कारखाने बंद झाले आहेत.
गेल्या वर्षी याच कालावधीत २ हजार ९८१ लाख टन उसाचे गाळप होऊन ३०२ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा २६६३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. महाराष्ट्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ लाख टनांनी पिछाडीवर पडला आहे. उत्तर प्रदेशही १० लाख टनांनी मागे आहे. या हंगामात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ८७ लाख टन साखरेची निर्मिती झाली. त्या खालोखाल महाराष्ट्रात ८० लाख टन साखर तयार झाली. गेल्या वर्षी ५३५ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. यंदा ५३३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. सध्या ११३ कारखाने सुरू आहेत.
देशाचा साखर उताराही घटला
गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी साखर उतारा १०.१५ टक्के इतका होता. यंदा यात घसरण होऊन तो ९. ३७ टक्क्यांवर आला आहे. प्रत्येक राज्यात सरासरी अर्ध्या ते एक टक्क्याने साखर उतारा घटला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशाचा साखर उताराही घटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चअखेर महाराष्ट्रात केवळ ६ साखर कारखाने सुरू असल्याचे चित्र आहे.