राज्यातील ५६ साखर कारखान्यांकडे ३१६ कोटींची एफआरपी थकबाकी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात कार्यरत असलेल्या कारखान्यांपैकी १४८ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली असली, तरी अद्याप ५६ कारखान्यांकडे सुमारे ३१६ कोटी रुपये थकीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत थकीत रकमेच्या वसुलीचा आढावा घेण्यात आला. ३१ मार्चपर्यंत कारखान्यांकडे एक हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी होती. त्यानंतर साखर आयुक्तालयाने कठोर पाठपुरावा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वसुली झाली असून थकबाकी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
शासनाने उर्वरित थकबाकीही लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश संबंधित कारखान्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत एफआरपीची संपूर्ण रक्कम वेळेत मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.





