बैठकीत मोबाईलवर गुंग, ‘दत्त’च्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : ऊस दराबाबत शासनातर्फे शिरोळ तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत दत्त कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोबाईलमध्ये गुंग राहिले, असा आरोप होत आहे. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

या संदर्भात कारखान्याच्या वतीने अद्याप कोणताही खुलासा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची साखर उद्योग विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

बैठक निष्फळ
दरम्यान, ऊस दराबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शिरोळ तहसील कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, तर कारखाना प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे ऊसदराबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, रात्री तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. गुरुवारी दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक घेण्याचे पत्र दिले. आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली.

गतवर्षी तुटलेल्या उसाला २०० रुपये आणि चालू गळीत हंगामात ३७०० रुपये ऊसदर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी रविवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ऊसदराबाबत मंगळवारी येथील तहसील कार्यालयात साखर उपसंचालक प्रतिनिधी, कारखाना प्रतिनिधी आणि आंदोलन अंकुश यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आर.एफ.एस.प्रमाणे मागील २०० रुपये द्यावेत, चालू हंगामात ३७०० रुपये उसाला भाव द्यावा, अशी मागणी यावेळी अंकुशच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली. तर श्री दत्त, गुरुदत्त शुगर्स, जवाहर, पंचगंगा, शरद कारखान्याच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. संचालक मंडळापुढे मागणीचा विषय ठेवण्यात येईल. त्यानंतर निर्णय देऊ, असे त्यांनी सांगितले.

मागण्यांबाबत तीन दिवसांत निर्णय जाहीर करा; अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दीपक पाटील व राकेश जगदाळे यांनी दिला, तहसीलदार हेळकर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून मार्ग काढण्याबाबत सूचना दिल्या. बैठकीत केवळ चर्चा झाली. कोणताही निर्णय झाला नाही.
यावेळी साखर संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी उद्धव कुंभार, मयूर साळोखे, दत्तचे कार्यकारी संचालक एम, व्ही. पाटील, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, शरद कारखान्याचे आर. एम. गंगाई, विजय जाधव, पी. एस. पाटील, पी. एम. पट्टणकुडे, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, आंदोलन अंकुशचे महेश जाधव, अक्षय पाटील, भूषण गंगावणे, पोपट संकपाळ आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »