ई-20 पेट्रोल सुरक्षितच : ओएमसी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

क्लोराईड मर्यादेतच असल्याचे अहवाल

नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलमध्ये ५०० पीपीएम क्लोराईड आढळत असल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आला होता. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) हा दावा फेटाळून लावला आहे. देशभरातील रिफायनरीपासून पेट्रोल पंपांपर्यंत विविध स्तरांवर तपासणी केल्यानंतर पेट्रोलमध्ये क्लोराईडचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओएमसींच्या माहितीनुसार, रिफायनरी, डिस्टिलरी, डेपो, टर्मिनल आणि पेट्रोल पंप अशा सर्व टप्प्यांवर नमुने घेऊन चाचण्या करण्यात आल्या. बहुतांश नमुन्यांमध्ये क्लोराईडचे प्रमाण एक पीपीएमपेक्षाही कमी आढळले, तर काही ठिकाणी ते तीन पीपीएमपेक्षा कमी होते. त्यामुळे पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नसल्याचे कंपन्यांनी सांगितले.

तसेच, इंधनाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांकडून तक्रार आल्यास वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही ओएमसींनी स्पष्ट केले. तपासणी अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो सार्वजनिक केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ई-20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो का, याबाबतही सतत निरीक्षण सुरू असून, सर्व मानकांचे पालन केले जात असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »