ऊस उत्पादकांचा ५-६ ऑक्टोबरला दिल्लीत एल्गार!

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस परिषदेच्या नेतृत्वाखाली ५ आणि ६ ऑक्टोबरला दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मानुस साळुंखे यांनी दिली.
साखरेचा किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) दर सध्याच्या ३० रुपयांवरून ५० रुपये किलो करावा आणि इथेनॉलचा दर ७० रुपये लिटर करावा, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत. या दरवाढीचा ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना फायदा होईल, असा परिषदेचा दावा आहे.
राजू शेट्टी, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांच्यासह राज्यातील इतर शेतकरी नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. आंदोलनासाठी संसद मार्ग पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून, ती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार आणि साखर महासंघाकडे यापूर्वी मागण्या मांडल्यानंतर आता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.






