वादळी वाऱ्याचा तडाखा; पाच एकर ऊस भुईसपाट!

भूम (धाराशिव ) : नऊ महिने ऊन-पावसाशी झुंज देत, दुष्काळी परिस्थितीत थेंब-थेंब पाणी देऊन वाढविलेला पाच एकर ऊस अवघ्या काही मिनिटांच्या वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला. पाठसांगवी येथील शेतकरी शशीराज माने यांनी ऊस पिकासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केला होता. पीक हातात येण्याची वेळ आली असतानाच वादळाने संपूर्ण पिकाचे मोठे नुकसान झाले.
यंदा पावसाने ओढ दिल्याने परिसरातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उपलब्ध पाण्यावर ऊस जगविण्यासाठी माने यांनी पाणी, खते, औषधांची फवारणी, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला. नऊ महिन्यांच्या मेहनतीनंतर ऊस चांगला उभा राहिला होता.
मात्र २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पाठसांगवी परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही वेळातच पाच एकरांवरील उभा ऊस आडवा झाला. डोळ्यादेखत उमेदीचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी माने यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
ऊस पिकासाठी केलेला खर्च, नऊ महिन्यांची मेहनत आणि पीक हातात येण्याची अपेक्षा यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. ऊस आडवा झाल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दुष्काळी परिस्थितीत पीक जगविण्यासाठी झालेला अतिरिक्त खर्च आणि आता वादळामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






