राजाराम कारखान्याच्या १८९९ जणांचे सभासदत्व वैधच

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (कसबा बावडा) १८९९ सभासद वैधच असल्याचा निवाडा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे. त्यामुळे अमल महाडिक – सतेज पाटील राजकीय द्वंद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्यासमोर एक मार्चला सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूनी आपले मत मांडले होते.
यामध्ये १८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रादेशिक सहसंचालकांनीही पुन्हा एकदा हा आक्षेप फेटाळून लावले व हे सभासद निवडणुकीत मतदानास पात्र झाल्याने हा मोठा धक्का मानला जातो.
विरोधी आघाडीकडून शौमिका महाडिक यांच्या संस्था गटातील ठरावाबाबत नोंदवलेला आक्षेपही प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळून लावला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या वाढीव सभासदांचा प्रश्र्न चांगलाच गाजला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सभासदांचे हक्क अबाधित ठेवले होते.
त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीने याच सभासदांवर आक्षेप घेतल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
ज्या पद्धतीने सप्तगंगा साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी केले आणि तिथला सहकार संपवून टाकला, त्याच पद्धतीने राजाराम कारखान्यातही सभासद कमी करून सत्ता घ्यायची आणि सहकार संपवायचा, असाच आमच्या विरोधकांचा कुटिल डाव होता, पण तो न्यायालय व सहकार खात्याने उधळून लावला. आमच्या लढ्याला आज पुन्हा एकदा यश आले. निःपक्षपाती निर्णयासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया अमल महाडिक यांनी व्यक्त केली.
महाडिक गटाने १८९९ सभासद पात्र झाल्याचे म्हटले असले, तरी त्यास सतेज पाटील गटाने हरकत घेतली आहे. महाडिक गटाने मुद्दाम हा आकडा फुगवून व्हायरल केला असल्याचे पाटील गटाचे म्हणणे आहे.
त्यांच्या मते आम्ही कारखान्याच्या ९९८ सभासदांविरोधात हरकत घेतली होती. तेवढ्याच सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी वैध ठरवले आहे. असे असताना हे १८९९ सभासद आले कोठून, असा प्रश्न सतेज पाटील गटाने उपस्थित केला आहे.