ई-२० पेट्रोलवरून पुण्यात जनसंवाद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वाहनचालकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

पुणे : ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत वाहनचालक, मेकॅनिक आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय ‘टाउन हॉल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी, (दि. १४ ऑगस्ट) दुपारी १ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे होणार असल्याचे आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार, प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही ‘टाऊन हॉल’ म्हणजे नागरिक, वाहनचालक, मेकॅनिक आणि संबंधित घटकाना एकाच व्यासपीठावर येऊन आपले प्रश्न व अनुभव थेट मांडण्याची महत्त्वाची संवादसभा असणार आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन अशा संमिश्र स्वरूपात पार पडणार आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे खुला, बिगर राजकीय आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बनणारे व्यासपीठ असणार आहे.

या कार्यक्रमात ई-२० पेट्रोलच्या सक्तीविरोधातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात नागरिक, वाहनचालक आणि मेकॅनिक यांना ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी मांडण्याची संधी मिळणार आहे. वाहनांच्या कार्यक्षमतेवर, मायलेजवर आणि देखभाल खर्चावर ई-२० इंधनाचा होणारा परिणाम याबाबतही चर्चा अपेक्षित आहे.

पुण्यातील या राज्यस्तरीय टाउन हॉलमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, वाहनचालक, मेकॅनिक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच नागरिकांच्या अनुभवांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरम्यान, ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत वाहनचालकांमध्ये निर्माण झालेल्या शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमातून ई-२० इंधनाच्या परिणामांबाबत प्रत्यक्ष अनुभव आणि नागरिकांचे प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »