इथेनॉल-मिश्रित डिझेलच्या चाचणीत ‘फ्लॅश पॉइंट’चा अडथळा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापरानंतर केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित डिझेलचीही चाचणी सुरू केली आहे. मात्र, इथेनॉल मिसळल्यानंतर डिझेलचा ‘फ्लॅश पॉइंट’ म्हणजेच पेट घेण्याचे तापमान कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आवश्यक सुरक्षा मानकांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या तांत्रिक त्रुटीची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी संसदेत दिली. त्यांच्या माहितीनुसार, इथेनॉल-मिश्रित डिझेलमध्ये फ्लॅश पॉइंट कमी होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वापरापूर्वी सुरक्षा निकषांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.

‘फ्लॅश पॉइंट’ म्हणजे एखाद्या इंधनातून ज्वलनशील वाफ तयार होऊन ती पेट घेण्यास सुरुवात होणारे किमान तापमान. इंधनाचा फ्लॅश पॉइंट कमी असल्यास त्याच्या हाताळणी आणि साठवणुकीदरम्यान अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि वाहन उत्पादकांच्या सहकार्याने इथेनॉल-मिश्रित डिझेलचे वैज्ञानिक मूल्यांकन केले आहे. या चाचण्यांच्या आधारे इंधनाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वापरासाठी आवश्यक मानके निश्चित करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »