श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला *सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार*

पुणे : जिल्ह्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला उल्लेखनीय आर्थिक नियोजनाबद्दल वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) तर्फे सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथे विस्माची साखर आणि जैव ऊर्जा परिषद व पुरस्कार वितरण सोहळा आणि प्रदर्शन शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, VSI चे उपाध्यक्ष व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक अजित चौगुले तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण या साखर कारखान्याला “सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास(आण्णा) रासकर, उपाध्यक्ष योगेश(बापू) ससाणे, सह-कार्यकारी संचालक माधव राऊत यांनी हा सन्मान स्वीकारला. प्रसंगी कारखान्याचे संचालक महेश करपे, अनिल भुजबळ, अनिल बधे. ज्ञानदेव कदम तसेच अन्य संचालक, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्यांची शिखर संघटना आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक कारखान्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साखर उद्योगामध्ये जास्तीत जास्त आधुनिकतेचा वापर करून साखर उद्योग स्थैर्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. यामधील देश पातळीवर कार्यरत असणारी “वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन” ही एक कार्यरत संस्था आहे.
कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री. पांडुरंग राऊत यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक हित, कारखान्याचे सुयोग्य प्रशासन, पारदर्शकता, साखर उत्पादनातील गुणवत्ता, उत्पादन खर्च बचत आणि कारखाना व्यवस्थापनातील विश्वासार्हता यांचा उत्तम संगम साधत कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्प, डिस्टिलरी, सीबीजी, CO2 प्रकल्प, बायो कंपोस्ट निर्मिती यासारखे प्रकल्प उभारून यशस्वीरीत्या चालविले आहेत.
हा “सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार” स्वीकारताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, पांडुरंग राऊत म्हणाले की, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची या पुरस्कारकरिता निर्धारीत निकषांनुसार निवड केली त्याबद्दल विस्माचे आभार. कमी खर्चामध्ये जास्त ऊस उत्पादन घेता यावे यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरू करून यश मिळविले आहे. उत्कृष्ट आर्थिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून कारखाना प्रगती साधत आहे. कारखाना बगॅस, स्टीम व वीजेची बचत तसेच मनुष्यबळाचा योग्य वापर आणि दर्जेदार साखर उत्पादन करण्यावर भर देत आहे. साखरेबरोबर विविध बायप्रॉडक्ट्स एकाच कारखान्यात उत्पादित होत आहेत. त्यामुळे आर्थिक सुबतता येण्यात मदत होते. विस्माचा पुरस्कार हा कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ व कर्मचार्यांचा सन्मान आहे.






