सुरक्षा रक्षकच निघाले चोर, चौघांना अटक

नाशिक | शुगरटुडे
जिल्ह्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातून (वसाका) दिवसाढवळ्या लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरताना कारखान्याच्याच चार सुरक्षा रक्षकांना स्थानिक तरुणांनी रंगेहाथ पकडले.देवळा पोलिसांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कारखान्याच्या आवारात एक कार संशयास्पदरीत्या फिरताना स्थानिक तरुणांना दिसली. तरुणांनी शंका आल्याने या वाहनाचा पाठलाग केला आणि वसाका-लोहोणेर रस्त्यावर गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता, त्यात कारखान्यातून चोरलेली लाखो रुपये किमतीची तांब्याची तार आणि मिलमधील सुमारे १०० ते १५० किलो वजनाची मोठी पितळी प्लेट, असा एकूण ३ ते ४ लाख रुपये किमतीचा माल आढळून आला. सुरक्षा रक्षकांनी हा माल कारखान्यातूनच चोरल्याची कबुली दिली.
या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये: हितेंद्र गंगाधर भामरे (रा. ठेंगोडा) , शरद तानाजी गरुड (रा. भऊर) , शरद वामन गरुड (रा. भऊर) आणि भाऊसाहेब दिलीप गांगुर्डे (रा. महालपाटणे) यांचा समावेश आहे. याप्रकरणी कारखान्याचे सुरक्षा पर्यवेक्षक कैलास पुंडलिक गरुड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, सुरेश कोरडे आणि दिलीप सोनवणे पुढील तपास करत आहेत.
हा कारखाना बंद असून, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि अवसायक देवळा यांच्या ताब्यात आहे.






