आज कृषिदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज १ जुलै
आज कृषी दिवस
आज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली जायची, ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा आवाज घराघरातून ऐकू यायचा. हा आवाज कुठेतरी आज लुप्त होताना दिसून येतोय. अनेक सम्स्यांनी ग्रासलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज पुन्हा कसा घुमेल यासाठी आजच्या कृषी दिनापासूनच प्रयत्न करायला हवे आहेत.
भारतीय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची आजची परिस्थीती सुधारणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगात वावरणारे लोकं कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. पण त्याची कोणालाच जाण नसते. शेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही. शेती करतांना अनेक अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो, ज्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बॅंक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांला शेतकरी प्रत्येक वेळेस सामोरे जातो असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो लाखो पैसे खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळं मिळतेच असे नाही. त्यामुळे सगळे बदलायला हवे आहे. पुन्हा एकदा ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा आवाज घराघरातून ऐकू यायला हवा. शेतकऱ्यांसाठीचा हा आवाज पुन्हा कसा घुमेल यासाठी आजच्या कृषी दिनापासूनच प्रयत्न करायला हवे आहेत. आजच्या कृषी दिवसाच्या निमत्ताने तमाम शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन
जन्म- १ जुलै १९१३. वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यांचा जन्म विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन शेतकरी कुटुंबात झाला. नाईकांचे मूळ आडनाव राठोड; पण गहुली हे खेडे वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी वसविले. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते वंजारी समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाला. त्यावरून पुढे नाईक हे आडनाव रूढ झाले. चतुरसिंग यांचा फुलसिंग हा मुलगा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्याच्या होनूबाई या पत्नीला दोन मुलगे झाले. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन १९३८ मध्ये नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली व १९४० साली एल्एल्.बी ही पदवीही मिळविली.
विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहाची परिणती वसंतराव व वत्सलाबाई यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहात झाली. या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच प्रतिष्ठाही वाढली. ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते १९५२–५६ या काळासाठी मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर १९६३ साली ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते. वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी निधन झाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »