आदिनाथसाठी प्रस्ताव मागविण्याची घोषणा

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुढील दहा वर्षांसाठी (२०२६-२७ ते २०३५-३६) सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कारखान्याची गाळप क्षमता सुमारे २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन आहे. इच्छुक सहकारी संस्था किंवा खाजगी कंपन्यांनी ठरविलेल्या अटी व शर्तींनुसार अर्ज सादर करावेत.
यापूर्वी थकित कर्ज वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न झाला होता. बारामती अॅग्रो प्रा. लि. कंपनीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कारखाना मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, ही प्रक्रिया पुढे सरकली नाही आणि वाद न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, पुन्हा एकदा कारखाना सहकारी तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला असून, यामुळे पूर्वीच्या करारावर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे. सभासद, कामगार आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार इच्छुकांना कारखान्याची आर्थिक व तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.






