आता सहकारी विमा कंपनी ; केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर करत केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकारी जीवन विमा कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या देशात लाखो सहकारी संस्था कार्यरत असून ग्रामीण भागात विमा संरक्षणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. ही दरी भरून काढण्यासाठी सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून विमा सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण नागरिकांना सुलभ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या विमा सुविधा उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला.
तज्ज्ञांच्या मते, सहकारी बँका, पतसंस्था आणि साखर कारखान्यांच्या व्यापक जाळ्याचा उपयोग करून विमा सेवा गावागावांत पोहोचविता येतील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच सहकारी क्षेत्रालाही नवे आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





