बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड
अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.
संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर मंगळवारी (ता. १३) सकाळी प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड झाली. थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. पांडुरंग घुले यांच्या नावाची सूचना विजय राहणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे आर.बी. राहणे, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक आदीसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या आशीर्वादाने व नेतृत्वाच्या विश्वासाने राज्यभरात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या पदांचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आपण केला. विधानसभेच्या निवडणुकीत अपघात झाला. परंतु यापुढे सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे. पक्षनेतृत्वाने कायम विश्वास टाकला असून, राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या समितीमध्ये पहिल्या २१ जणांमध्ये आपला समावेश आहे. हा सन्मान तालुक्याच्या जनतेचा असून, सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात केले.