‘विघ्नहर’ची नवी मिल दीड महिन्यात उभी करून हंगाम सुरू केला

आवडल्यास ही बातमी शेअर करा
  • नंदकुमार सुतार / मुख्य संपादक – शुगरटुडे Magazine

विविध पुरस्कारांनी गौरवलेला आणि महाराष्ट्रातील नामवंत सहकारी साखर कारखान्यांपैकी एक म्हणजे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना…. या कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक अर्थात एमडी श्री. भास्कर घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, पण घुले यांना खडतर आव्हाने पेलणे आवडते. कारखान्याची मिल एका महिन्यात उभी करून गाळप हंगाम सुरू करण्याचे असेच एक अत्यंत कठीण आव्हान त्यांनी पेलले…. त्यांनी हे दिव्य कसे काय साध्य केले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे….

जीतेंगे हम ये वादा करो,
कोशिश हमेशा ज्यादा करो ।
किस्मत भी रूठे, पर हिम्मत ना टूटे
मजबूत इतना इरादा करो ।

भास्कर घुले यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंपैकी धडाडीचा पैलू या शायरीतून उत्तमपणे व्यक्त होतो, असे म्हणता येईल. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवा नेते सत्यशीलदादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याच्या विस्तारीकरणाचा विडा त्यांनी उचलला. झपाट्याने कामाला लागले. क्रशिंग मिलची क्षमता आधी वाढवायची होती. जुनी मिल बाजूला केली. नव्या मिलसाठी पाया घातला. अन्‌ अनपेक्षितपणे आर्थिक आव्हाने उभी राहिली. अनंत अडचणी येत गेल्या.

पहिल्या बँकेकडून कर्ज प्रस्तावास खूपच विलंब होतोय, हे लक्षात आल्यानंतर ऐनवेळी दुसऱ्या बँकांकडे धाव घ्यावी लागली. त्यामुळे एमडी घुले यांच्यावरील ताण वाढला. नवे प्रस्ताव करणे, नवे फायनान्स शोधणे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. आता कोण फंडिंग करणार? टेन्शन वाढतच गेले. नवा सीझन काही महिन्यांवर आलेला… हातात अत्यंत कमी वेळ! मात्र घुले यांनी हार मानली नाही. कारखान्याचा यंदाचा हंगाम कुठल्याही परिस्थितीत वाया जाऊ द्यायचा नाही, अशी शपथच त्यांनी श्री विघ्नेश्वराला स्मरून घेतली.

आर्थिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बळ एकवटले. कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर आणि स्व. सोपानशेठ शेरकर यांचा वारसा काही गेल्या खंडित होऊ द्यायचा नाही, अशी खूणगाठ बांधून श्री. घुले कामाला लागले. बँका, सीए आदींचे शेकडो हेलपाटे मारले. मोठ्या जिद्दीने फायनान्सरपुढे सादरीकरण केले. कारखान्याची उज्ज्वल परंपरा मांडली… आणि अखेर एके ठिकाणी आशेचा किरण दिसला. निधी मंजूर झाला. पण आता आव्हान होते ते कमी वेळेत कारखाना सुरू करण्याचे….

दरम्यानच्या काळात अनेक लोक, तज्ज्ञ, अन्य कारखानदार श्री विघ्नहर कारखान्याच्या साईटवर येत. पाहणी करत आणि यंदा कारखाना सुरू होणार नाही, असे भाकीत करून जात. परंतु वरील शायरीप्रमाणे घुले यांचा स्वत:वर विश्वास होता. १ नोव्हेंबर २०२४ रोजी मिलची उभारणी सुरू झाली, रात्रंदिवस काम सुरू राहिले. स्वत: घुले डोळ्यात तेल घालून साईटवर उभे राहिले… आणि अखेर चमत्कार घडला. अवघ्या दीड महिन्यात मिल उभी राहिली आणि गव्हाणीत उसाची मोळी पडली. चेअरमन सत्यशीलदादांनी एमडींची पाठ थोपटली. हा चमत्कार घडवला, श्री. भास्कर घुले यांनी! त्यांच्या अथक मेहनतीने, दूरदृष्टीने आणि संकटांना संधीमध्ये रूपांतर करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे. रोज नवी संकटे यायची, मात्र त्यांनी सर्वांवर मात केली. म्हणून म्हणावे वाटते….

रोज रोज गिरकर भी मुकम्मल खड़ा हूँ,
ऐ मुश्किलों, देखो मैं तुमसे कितना बड़ा हूँ।

Satyashil Sherkar
नव्याने उभारलेल्या मिलची पाहणी करताना चेअरमन, युवा नेते सत्यशीलदादा शेरकर

समर्पित व्यक्तिमत्त्व
श्री. भास्कर घुले म्हणजे असे हे उसाप्रमाणेच बहुपयोगी, बहुगुणी आणि साखर उद्योगाला समर्पित नेतृत्व आहे. ते नेहमी कारखान्याच्या नियमित व्यवस्थापनात गुंतलेले असतात व संस्थेचे पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करतात अचूक निर्णय क्षमता ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

Bhaskar Ghule MD
श्री. भास्कर घुले यांना प्रत्यक्ष कामाला भिडणे आवडते

साखर उद्योगातील ज्ञानी आणि प्रज्ञावंत असलेल्या घुले यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. रोज दहा किमी चालणे आणि सर्वात आधी कार्यालयात जाऊन कामास सुरुवात करणे, या त्यांच्या शिरस्त्यात गेल्या कित्येक वर्षांपासून खंड पडलेला नाही.
प्रामाणिकपणा, चिकित्सक वृत्ती, गरजूंना मदत हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. ते उत्तम वक्तादेखील आहेत. त्यांनी प्रथमतः सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला. आणखी शिकायची ऊर्मी होती, प्रबळ इच्छा होती. मात्र अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल ओव्हरसियर म्हणून काम सुरू केले.

कामाप्रति असलेली निष्ठा आणि रात्रंदिवस वाहून घेण्याच्या वृत्तीमुळे श्री. घुले हे व्यवस्थापन मंडळाच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांना नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल इंजिनिजर म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून रुजू झाले आणि कामाचा झपाटा, निर्णयक्षमता या गुणांमुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरले.

आणखी शिकण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती, नोकरी करत करत ते इंग्रजी विषयामध्ये बीए झाले आणि एमबीएची पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे कार्यकारी संचालकाची परीक्षाही ते अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्येच त्यांना कार्यकारी संचालक म्हणून संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले.

सतत कार्यमग्न राहणे हे त्यांचा आणखी एक गुण. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नाहीत. त्यामुळे आजार वगैरे त्यांच्या जवळपास फिरकत नाहीत. त्यांचे पहिले प्राधान्य कर्तव्य आणि नंतर कुटुंब आहे. कार्यमग्नता हे त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून व्यसनच जणू बनले आहे. अशक्य किंवा नाही हा शब्द त्यांच्याकडे नाहीतच.

सकारात्मक विचार करुन हाती घेतलेले काम पूर्ण झालेच पाहिजे हा त्यांचा ध्यास असतो. हा कारखाना माझा आहे आणि त्याप्रति माझी सर्वोच्च जबाबदारी आहे या भावनेतून ते कामामध्ये झोकून देऊन ते दिवस-रात्र मेहनत करतात. व्यवस्थापनातील अशक्य असणार्‍या गोष्टी शक्य करुन दाखविण्यात ते वाक़्‌बगार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेले आहे, त्या-त्या विकाणी अतिशय विश्वासाने, प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे, प्रचंड कष्टाने त्यांनी काम केलेले आहे.

ते कामगाराभिमुखही आहेत. हा सारा डोलारा कामगारांमुळेच उभा आहे, याची त्यांना आहे. परिस्थिती कोणतीही असो पण कामगारांना बोनस दिलाच पाहिजे, त्या शिवाय माझी दिवाळी गोड होणार नाही यासाठी ते आग्रही असतात. आपला साखर कारखाना ही लाखोंची जननी आहे आणि त्या मातेची आपण सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. या मातेच्या अस्तित्वासाठी आपण झगडले पाहिजे, जेणेकरुन त्या जननीच्या माध्यमातुन हजारो कुटुंबे आनंदी आयुष्य जगतील, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.

कुटुंबवत्सल
व्यक्तिगत आयुष्यात श्री. घुले खूप कुटुंबवत्सल आहेत. संपूर्ण परिवाराचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा विद्यादानाचे कार्य करतात. म्हणजे शिक्षिका आहेत. त्यांची मुले श्रद्धा आणि शुभम यांनी वडिलांचा कार्य संस्कारांचा वारसा पुढे चालवला आहे. किंबहुना दोन्ही मुले वडिलांपेक्षा काही पावले पुढेच आहेत. कन्या श्रद्धा या आंतरराष्ट्रीय खेळाडू असून, गुजरात स्पोर्ट्स अकादमीमध्ये कोच आहेत, तर जावई रवींद्र ज्ञानेश्वर खताळे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या अहमदाबाद येथे आयुक्त आहेत. चिरंजीव शुभम हे निमाई डेअरी फार्म लि. या नामवंत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. स्नुषा डॉ. विनिता या वैद्यकीय सेवेत आहेत.


‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने श्री. भास्कर घुले यांना वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »