इंजिनिअर कवी वाळू आहेर यांच्या ‘वाळूचे कण’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 नाशिक :- ग्रामीण जीवनातील वास्तव आणि सामाजिक जीवनावर भाष्य असणाऱ्या कविता कवी वाळू आहेर यांच्या 'वाळूचे कण' या कवितासंग्रहात आहेत. संवेदनशीलपणे कवी सामाजिक घटनांवर व्यक्त होत असल्याने काव्यप्रतिभेची देणगी असणारे साहित्यिक खऱ्या अर्थाने भाग्यवंत असतात, असे उदगार नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष इंजि.बाळासाहेब मगर यांनी काढले.

 कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात साखर तंत्रज्ञ आणि कवी इंजि.वाळू आहेर लिखित आणि ज्ञानसिंधू प्रकाशन प्रकाशित 'वाळूचे कण' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्री.मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर हभप वसंतराव गुंजाळ, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे, प्रकाशक तान्हाजी खोडे, कवी वाळू आहेर आणि छाया आहेर उपस्थित होते.

 श्री.मगर म्हणाले की, आजच्या अस्वस्थतेच्या काळात साहित्यातून व्यक्त होणे जोखमीचे बनले आहे. समाजातील अध:पतनामुळे कवी आणि साहित्यिकांचे काम कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कवी वाळू आहेर यांनी विविध विषयांवरील आशयसंपन्न कवितेचा खजिना कवितांच्या माध्यमातून मांडला आहे, असेही ते म्हणाले.

 हभप वसंतराव गुंजाळ यांनी आपल्या भाषणात काव्य म्हणजे वेदनेतून निर्माण झालेले वेद. कवितेत दिव्यदृष्टी असली तरच चिरंजीव काव्याची निर्मिती होईल. कारण साहित्यशास्त्रातील अतिशय श्रेष्ठ आणि अनुपम निर्मिती म्हणजे काव्य होय, असे विचार मांडले. सुरेश निकम, सुरेश पवार, अलका दराडे, प्रकाशक तान्हाजी खोडे, डॉ.रोहिणी कापसे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना कवी वाळू आहेर यांनी आपल्या भाषणात गेल्या ४० वर्षांच्या वाटचालीत साखर उद्योगाविषयी उज्ज्वल भविष्यासाठी चिंतन करण्याबरोबरच आयुष्यात जे क्षण अनुभवास आले, ते क्षण या कवितांमध्ये रेखाटले असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील रसिकांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 आरोह कापसे यांनी संग्रहातील कविता सादर केली. इंजि.सुप्रिया आहेर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अजय कापसे यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »