सहकारी साखर कारखान्यांची ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोलाची साथ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भारतातील सहकार चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची खुप मोठी ताकद आहे.ग्रामीण भारतात उद्योग व्यवसाय,बाजारपेठ, रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा इ.बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष करून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने या बाबत अग्रगण्य राहिले असून त्यांनी ग्रामीण अर्थ व्यवस्थेला मोलाची साथ दिली आहे व देत आहेत.

भारताची अर्थ व्यवस्था झपाट्याने बदलत असून सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी , कामगार,नागरिक, महिला , लघुउद्योजक , व्यावसायिक यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहारात परिवर्तन घडवून येत आहे. सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास हेच तर सहकाराचे मर्म असून केवळ नफा मिळविणे हाच एकमेव उद्देश नसून सर्व सभासदांचे व समाजाचे आर्थिक सक्षमीकरण व प्रगती हेच उद्दिष्ट असते आणि त्यामुळेच ग्रामीण भागातील जनसामान्यांना व आर्थिक दुर्बल घटकांना प्रवाहात आणणेस सहकार यशस्वी ठरला आहे.


एकेकाळी भारत देशात ज्या वेळी पाचशे सहकारी साखर कारखाने सुरू होते त्यापैकी सुमारे दोनशे सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात होते. सहकारी साखर कारखाने हे राज्याचे ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी प्रभावी माध्यम होते. आज आपण ग्रामीण भागातील जी अद्ययावत शाळा , महाविद्यालये , तंत्रनिकेतने, वैद्यकीय महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये , ग्राहक भांडार , कामगार पतपेढी , शिक्षण संस्था , मंगल कार्यालये , नाट्य गृह आदी सोईसुविधा पहात आहोत, ते केवळ आणि केवळ सहकारी साखर कारखान्यांमुळेच शक्य झालेले आहे.


परंतु , कालांतराने सहकारा मध्ये आलेला व्यवस्थापना मधील पारदर्शकपणाचा अभाव, कामकाजातील अनियमितपणा , शिस्त व नियोजनाचा अभाव , आर्थिक गैरव्यवहार , वाढती स्पर्धा , कायद्याचे बंधन , तांत्रिकतेचा अभाव यांसह परिपक्व नेतृत्वाचा अभाव अशा
अनेक वेगवेगळया कारणांमुळे सहकारी साखर कारखान्यांना ग्रहण लागले व अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत येऊ लागले व बंद पडले व पुढे पर्यायाने संबंधित बॅंकानी ते कारखाने जप्त करून त्यांची विक्री केली व ते खाजगी तत्वावर चालविले जाऊ लागले.

त्या मुळे तेथील कामगार व शेतकरी यांची देणी तशीच थकित राहिली व पुढे त्या कारखान्यातील कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. जे काही बंद सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर, सहयोगी तत्वावर अथवा दीर्घ मुदतीचे कराराने चालविण्यास दिले आहेत त्या पैकी एखादाच अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याचा करार पुर्ण होईपर्यंत कारखाना चालविण्यात आल्याचे तसेच करारानुसार सर्व अटी शर्तींचे पालन झाल्याचे दिसून येत नाही.


आता सहकारी साखर कारखान्यांची संख्या राज्यात शंभरीत आली असल्याचे दिसून येते. तशातच महाराष्ट्र शासनाने सन २००३ पासून नवीन सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी बंद केल्यामुळेही नवीन सहकारी साखर कारखाने राज्यात निर्माण होत नाहीत.
सध्या राज्यात सुमारे शंभर सहकारी व शंभर खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत.


ज्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री होते , तेथील कामगारांचा पगार, भविष्य निर्वाह निधी , शेतक-यांचे ऊस पेमेंट इ. बाबी थकित तर रहातातच परंतु , महत्वाचे म्हणजे कामगारांचे रोजगाराचा , निवासाचा प्रश्न निर्माण होतो व कुटुंबाची गैरसोय होते.


अशाच प्रकारे एखादी सहकारी बँक जर अडचणीत येऊन बंद पडली किंवा पडणार असेल तर त्या बॅंकेचे दुस-या एखाद्या सक्षम सहकारी बॅंकेत विलीनीकरण करून तेथील सभासद, खातेदार यांचे हित जपले जाते. एकट्या काॅसमाॅस बॅंकेत इतर एकोणीस बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आलेचे उदाहरण आहे. त्याच धर्तीवर , आता राज्याचे जे नवीन सहकारी धोरण ठरत आहे , त्या मध्ये जर सध्या जे काही सहकारी साखर कारखाने आर्थिक अथवा अन्य काही अडचणी मुळे बंद आहेत किंवा जे सध्या तोट्यात आहेत व पुढे जाऊन बंद पडून पुन्हा विक्री केले जाणार आहेत, असे कारखाने इतर इच्छुक सहकारी साखर कारखान्यांमध्ये विलीनीकरणा बाबतचे कायद्याचा योग्य त्या कलमांसह नवीन सहकार धोरणात समावेश करण्यात यावा , जेणेकरून कारखान्याची स्थावर व इतर मालमत्ता , यंत्रसामुग्री सहकारी साखर कारखान्याचेच मालकीची राहील.

सभासदांचे भाग , हक्क तसेच कामगारांचा रोजगार कायम राहील व कारखाना शेतकऱ्यांचे मालाकीचाच राहील व सहकारी तत्त्वावरच चालेल. आजही काही सहकारी साखर कारखाने खुपच चांगली कामगिरी करीत असून आर्थिक दृष्ट्या सुदृढ आहेत. काही सहकारी साखर कारखान्यांचे चार पर्यंत युनिट (शाखा) आहेत.


सहकार हे आपल्या राज्याचे वैभव आहे. ते जपले पाहिजे व टिकले पाहिजे.बिना संस्कार नहीं सहकार व बिना सहकार नहीं उध्दार या सहकार भारतीच्या घोषवाक्याचे अनुकरण केल्यास महाराष्ट्रातील सहकार निश्चितच पुन्हा ऊभारी घेईल.

(लेखक साहेबराव खामकर हे सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख आहेत. मो. ९६२५३४३४३४)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »