हरियाणातील सर्व कारखान्यांना टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

गुरुग्राम : ऊस दर (एसएपी) वाढवून न मिळाल्यास हरियाणातील सर्व साखर कारखान्यांना टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यासाठी २० जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे.
उसाची एसएपी (स्टेट ॲडव्हायझरी प्राइस) वाढवण्यासह ऊस उत्पादक शेतकरी हरियाणात आंदोलन करत आहेत. येथे एफआरपी ऐवजी एसएपीनुसार ऊस दर दिले जातात. त्याला एमएसपी किंवा किमान आधारभूत दर असेही म्हणतात.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीने १६ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. त्याला शेतकरी संघटनांना निमंत्रित केले आहे.
‘गन्ना किसान संघर्ष समिती’चे प्रदेश उपाध्यक्ष रामपाल चहल यांनी सांगितले की, भारतीय किसान युनियन (चारुणी) च्या नेतृत्वाखाली कर्नाल येथे किसान महापंचायत सुरू आहे, त्यावेळी आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर, 20 जानेवारीपासून राज्यातील सर्व साखर कारखान्यांना अनिश्चित काळासाठी टाळे ठोकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे..
चहल म्हणाले की, राज्य सरकारने जिल्हा प्रशासनामार्फत १६ जानेवारीला बैठक बोलावली आहे. त्यावेळी कृषी मंत्री जे.पी. दलाल उपस्थित राहणार आहेत. आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. अन्यथा आम्ही ऊस दरासाठीचे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला.
बीकेयू (चारुणी) आणि साखर कारखानदार समित्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले शिष्टमंडळ समितीला भेटून त्यांची आधारभूत किंमत वाढवण्याची मागणी करणार आहे. जर कोणताही अनुकूल तोडगा निघाला नाही, तर शेतकरी 17 जानेवारीपासून पीक कापणी थांबवतील आणि 20 जानेवारीपासून सर्व साखर कारखान्यांना अनिश्चित काळासाठी टाळे ठोकतील,” असे चहल म्हणाले.
हरियाणातील ऊस उत्पादक शेतकरी निविष्ठा खर्चात वाढ झाल्यामुळे प्रति क्विंटल ₹ 450 ची आधारभूत किंमत मागत आहेत, परंतु सरकारने ₹ 362 प्रति क्विंटल किंमत अधिसूचित केली आहे, जी मागील वर्षी सारखीच आहे.