उगार शुगरला दिला नवा दृष्टिकोन

आवडल्यास ही बातमी शेअर करा
कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे २५ जून २०२६ रोजी दु:खद निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी द उगार शुगर वर्क्स लिमिटेडचे चेअरमन म्हणून अनेक वर्षे यशस्वी नेतृत्व केले. तसेच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष असताना, त्यांनी साखर उद्योगाच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली.

राजाभाऊ शिरगावकर यांनी केवळ उगार शुगर समूहाचा विस्तार केला नाही, तर भारतीय साखर उद्योग अधिक स्पर्धात्मक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि शाश्वत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. साखर उत्पादन, ऊस विकास, उपउत्पादनांचे मूल्यवर्धन, इथेनॉल आणि ऊर्जा निर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आधुनिक दृष्टीकोन रुजवला.

साखर उद्योगाचा मानबिंदू

भारतीय साखर उद्योगाच्या विकासात काही मोजक्या उद्योगपतींनी दूरदृष्टी, व्यवस्थापन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. त्यामध्ये राजाभाऊ शिरगावकर यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. त्यांनी उगार शुगर समूहाच्या प्रगतीसाठी चार दशकांहून अधिक काळ दिलेले नेतृत्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शेतकरी हिताला दिलेले प्राधान्य यामुळे ते साखर उद्योगातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात.

शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील प्रवेश

राजेंद्र शिरगावकर यांनी लंडन विद्यापीठातून बी.एस्सी. (ऑनर्स) तसेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणानंतर त्यांनी भारतात परत येऊन साखर उद्योगात आधुनिक व्यवस्थापन आणि तांत्रिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी काम सुरू केले. त्यांच्या अभियांत्रिकी पार्श्वभूमीचा मोठा फायदा उद्योगाच्या विस्तारात झाला.

उगार शुगरच्या विकासात मोलाचे योगदान

शिरगावकर यांनी चार दशकांहून अधिक काळ उगार शुगर समूहाच्या प्रगतीसाठी नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, ऊर्जा निर्मिती, इथेनॉल आणि विविध पूरक उद्योगांचा विस्तार यावर भर देण्यात आला. आज उगार शुगर समूह हा देशातील प्रमुख एकात्मिक साखर उद्योगांपैकी एक मानला जातो.

त्यांच्या नेतृत्वाखाली उगार शुगरने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता बगॅसवर आधारित वीज निर्मिती, इथेनॉल उत्पादन आणि उपउत्पादनांचा प्रभावी वापर करून शाश्वत औद्योगिक विकासाचा मार्ग स्वीकारला. पर्यावरणपूरक आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणारे उद्योग व्यवस्थापन हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

शेतकरी विकासाला प्राधान्य

शिरगावकर यांची कार्यशैली केवळ उद्योग विस्तारापुरती मर्यादित राहिली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ आणि गुणवत्तापूर्ण ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. उद्योगाची प्रगती आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती या दोन्ही गोष्टी परस्परपूरक असल्याचा त्यांचा दृष्टिकोन राहिला.

ते उगार शुगर समूहाचे चेअरमन एमेरिटस (Chairman Emeritus) म्हणून कार्यरत होते. समूहाच्या दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनात मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. नवीन पिढीच्या नेतृत्वाला उद्योगातील अनुभव आणि दृष्टी देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

सामाजिक बांधिलकी

उद्योगासोबतच शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि सामाजिक उपक्रमांमध्येही शिरगावकर समूहाने सातत्याने योगदान दिले. उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ग्रामीण भागाचा विकास आणि सामाजिक उत्तरदायित्व यांनाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले.

शिरगावकर हे केवळ यशस्वी उद्योगपती नसून दूरदृष्टी असलेले व्यवस्थापक, शेतकरी हिताचे पुरस्कर्ते आणि आधुनिक साखर उद्योगाचे प्रभावी शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे उगार शुगर समूहाने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून, उद्योग, शेतकरी आणि समाज यांच्यात समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. २०१८ मध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (KCCI) च्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आणि लायन्स क्लब यांनी त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट (जीवन गौरव) पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

शुगरटुडे परिवाराची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »