महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला *राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार* प्रदान

पुणे : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान (अमरावती) यांच्या वतीने उत्कृष्ट कृषी संस्था पुरस्काराअंतर्गत राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास (एमसीडीसी) गुरुवारी (दि.28) प्रदान आला.
महामंडळाचे संचालक या नात्याने राज्याचे साखर आयुक्त डॉ. . संजय कोलते यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी उत्कृष्ट रेशीम उत्पादक शेतकरी अॅड. विवेक लगड पाटील (अहिल्यानगर), उत्कृष्ट युवा शेतकरी पुरस्कार विशाल प्रदीप पाटील (तासगाव-सांगली) यांना देण्यात आला. यावेळी एमसीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालिका सोनाली रावल ठाकूर, माजी व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, प्रतिष्ठानच्या सदस्य पौर्णिमा सवाई, डॉ. दिलीप काळे, राहुल तायडे पाटील, जयसिंगराव देशमुख, महामंडळाचे डॉ. भास्कर पाटील, हेमंत जगताप ,कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली मंडळ दमदार वाटचाल करीत आहे .. मंडळाचे सन्माननीय संचालक सहकार आयुक्त, साखर आयुक्त व पणन संचालक यांचेही मार्गदर्शन मंडळाला नेहमीच लाभत आहे. यामुळे महामंडळ अशी प्रगती करू शकला आहे, याचा विशेष उल्लेख माजी व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केला..
डॉ. कोलते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात एमसीडीसीला उर्जित अवस्था नव्हती. आता महामंडळाने चांगल्या नियोजनाद्वारे व सांघिक कामगिरीच्या जोरावर अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रशिक्षणाद्वारे चांगला बदल घडविला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, घरांपर्यत जाऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हे महामंडळ काम करत आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे म्हणाले, सहकार महामंडळाचे अधिकारी फक्त शासकीय वेळेत काम करत नसून शेतकऱ्यांप्रती सातत्याने काम करीत आहेत. म्हणून त्यांचा सन्मान करत आहोत.
मंगेश तिटकारे यांनी प्रास्तविक केले, तर एमसीडीसीचे प्रशिक्षण विभागाचे विभागप्रमुख दिगंबर साबळे यांनी आभार मानले.






