साखरेचा परिणाम गुळावरही; दर ५०० रुपयांनी खाली

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांत देशभरातील घाऊक बाजारात साखरेच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर आता गुळाच्या बाजारावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये प्रतिक्विंटल तब्बल ५०० रुपयांनी दर कमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने किरकोळ बाजारात साखर प्रतिकिलो ७२ रुपयांपर्यंत पोहोचली होती. सणासुदीच्या काळात दर आणखी वाढतील, या शक्यतेने केंद्र सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला. तसेच साठेबाजांवर करडी नजर ठेवल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून साखरेचे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत.
साखरेच्या बाजारातील या घडामोडींचा परिणाम गुळाच्या दरांवरही दिसून येत आहे. कोल्हापूरमधील एका साखर कारखान्याची साखर प्रतिक्विंटल ५,४०० ते ५,५०० रुपयांनी विकली जात असल्याने गुळाच्या बाजारातही दर घसरले आहेत. सोमवारी गुळाला प्रतिक्विंटल सुमारे ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता.
दरात आणखी वाढ होईल, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे काढण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे सोमवारी बाजारातील सौदे काढण्यात आले नव्हते. आता बुधवारी पुन्हा सौदे सुरू होण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे पुढील काही दिवसांत गुळाच्या बाजारातील चढ-उताराकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.






