मागणीअभावी साखर गडगडली ; क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण

पुणे : केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि साखर साठ्याची माहिती संकलनाच्या हालचालींमुळे साखर बाजारावर दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम साखरेच्या निविदा दरावर झाला असून, मागणीअभावी दर क्विंटलमागे तब्बल 500 रुपयांनी गडगडले आहेत.
ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22.50 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. कोट्याची विक्री करण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना ग्राहकांकडून उठाव कमी होत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या निविदांमध्ये S-30 ग्रेड साखरेचा दर घसरून 5400 ते 5500 रुपयांवर आला आहे. काही कारखान्यांनी तर 5200 रुपयांच्या दरानेही खुल्या विक्रीद्वारे साखर विक्रीस ठेवली आहे.यापूर्वी मागणीच्या तुलनेत कोटा कमी असल्याने सटोडियांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला होता, त्यामुळे S-30 ग्रेड साखरेचे घाऊक बाजारातील दर क्विंटलला 7,000 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
मंगळवारी हेच दर 300 ते 400 रुपयांनी घसरून 6000 ते 6200 रुपयांवर आले आहेत. निविदांमधील दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.केंद्र सरकारकडून साखरेचे दर आटोक्यात आणण्यासाठी सट्टेबाजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कारखान्यांवरील विक्रीनुसार शिल्लक साठ्याची माहिती गोळा केली जात असून, कारवाईच्या भीतीने बाजारात दर घसरणीला सुरुवात झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन अधिक कोटा खुला केला जाण्याची चर्चा बाजारात आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे दर घसरण्याचा ट्रेंड सुरू झाला असून, सोमवारपर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल.






