साखर दरातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जयसिंगपूर : गत गळीत हंगामात तुटलेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह विविध उपपदार्थांना वर्षभर चांगले दर मिळाले आहेत. साखरेच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने शिरोळ तालुक्यातील दत्त, जवाहर, गुरुदत्त आणि पंचगंगा या साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे. सध्याच्या परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी वाढते खत व औषधांचे दर, वाढलेली मजुरी तसेच ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.

दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांत साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी दिसून आली. त्यामुळे गत हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन ३०० रुपयांचा अतिरिक्त हप्ता देऊन तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कारखान्यांनी ही मागणी तातडीने मान्य करून रक्कम जमा न केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच कारखान्यांतून बाहेर पडणारी साखर आणि इतर उपपदार्थ रोखण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या वेळी संघटनेचे राजाराम देसाई, सचिन शिंदे, राम शिंदे, तानाजी वठारे, विशाल चौगुले, बंडू पाटील, पुरंदर पाटील, कलगोंडा पाटील, मिलिंद कोले, धुळगोंडा पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. साखरेच्या दरातील तेजीच्या पार्श्वभूमीवर प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याच्या मागणीला संघटनेने जोर लावला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »