इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद

सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी डिस्टिलरी प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे नियोजन सुरू केले आहे.

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती, आर्थिक मदत आणि अनुदान धोरणे लागू केली आहेत. त्यामुळे साखर उद्योगाला निश्चित बाजारपेठ उपलब्ध झाली असून कारखान्यांच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळत आहे. इथेनॉलची जलद विक्री आणि तातडीने मिळणारा निधी यामुळे कारखानदार डिस्टिलरी प्रकल्पांच्या विस्ताराकडे अधिक लक्ष देत आहेत.

जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन केले. या काळात एकूण सुमारे १.९६ लाख किलो लिटर इथेनॉल उत्पादनाची नोंद झाली. स्वराज कारखान्याने सर्वाधिक ७७,३०८ किलो लिटर उत्पादन केले असून, दत्त इंडियाने ३६,८१७, जरंडेश्वरने ३६,७९३, सह्याद्रीने १५,१९०, खटाव-माणने १२,२२९, शरयू अ‍ॅग्रोने ६,०७५ आणि अजिंक्यताराने ५,९०७ किलो लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे.

साखर उद्योग आता केवळ साखरेपुरता मर्यादित न राहता ‘ऊस-साखर-मळी-इथेनॉल-वीज’ या एकात्मिक पद्धतीने विकसित होत आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे स्वतंत्र डिस्टिलरी प्रकल्प असून, काही कारखान्यांनी त्यांची क्षमता वाढविण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत.

मका व धान्याधारित फीडस्टॉकचा वापर करूनही इथेनॉल निर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रकल्प उभारले जात आहेत. कृष्णा, अजिंक्यतारा, सह्याद्री, स्वराज, दत्त इंडिया आणि लोकनेते बाळासाहेब देसाई आदी कारखान्यांकडून डिस्टिलरी क्षमतेत वाढ करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

इथेनॉल निर्मितीतील वाढीमुळे साखर कारखान्यांना उत्पन्नाचा नवा आणि स्थिर स्रोत उपलब्ध झाला असून, जिल्ह्यातील साखर उद्योगाच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »