ऊसदर ठरवा, त्यानंतरच गाळप सुरू करा; ‘स्वाभिमानी’चा इशारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करू नये. १० ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित कारखान्यांचे वजनकाटे बंद पाडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला.

याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेने हुतवळी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी चर्चा करून, ऊसदरासंदर्भातील निर्णय झाल्यानंतरच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू करण्याबाबत आश्वासन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सध्या उसाचे वजन कमी असून, रिकव्हरीही समाधानकारक नाही. अशा परिस्थितीत घाईने गाळप सुरू केल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका बसेल. पूर्ण वाढ न झालेला ऊस तोडल्यानेही नुकसान होईल, असे राजोबा यांनी सांगितले.

दुष्काळ, पाणीटंचाई, वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे दर तसेच औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चामुळे ऊस उत्पादक आधीच आर्थिक अडचणीत आहेत. कारखान्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली.

ऊसदर, उसाची सद्यस्थिती, वजन आणि रिकव्हरी यांबाबत निर्णय घेण्यासाठी साखर कारखानदार, प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची तातडीने संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होण्यापूर्वी गाळप सुरू झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित कारखानदार आणि प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »