सणासुदीसाठी साखर पुरवठ्यात वाढ!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात १४ लाख टन कोटा मंजूर

पुणे : देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यासाठी १४ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश ३० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला असून, देशातील साखर कारखाने आणि दोन रिफायनरींना कोटा देण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात १३ लाख टन, तर दुसऱ्या पंधरवड्यात १३.५० लाख टन साखरेचा विक्री कोटा मंजूर करण्यात आला होता. त्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातील कोट्यात वाढ करण्यात आली आहे. राज्यनिहाय वाटपात महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा मिळाला असून, त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे.

पहिल्या आठवड्यात ८५ टक्के साखर विक्री बंधनकारक

कारखान्यांनी मंजूर कोट्यापैकी किमान ८५ टक्के साखरेची विक्री पहिल्या आठवड्यात करणे बंधनकारक आहे. विक्री झालेली साखर सात दिवसांच्या आत कारखान्यातून पाठवावी लागणार आहे. कोट्यातील साखरेची विक्री १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून त्याचा तपशील १८ ऑक्टोबरपर्यंत सादर करावा लागेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांचा नोव्हेंबरमधील कोटा नाकारला जाऊ शकतो.

सणासुदीच्या काळात घरगुती वापर, मिठाई उद्योग आणि अन्य क्षेत्रांतून साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या पंधरवड्यासाठी मंजूर केलेला कोटा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यास पुरेसा ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »