राजगड साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्धार; संग्राम थोपटेंची सभासदांना ग्वाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राजगड सहकारी साखर कारखाना नव्याने उभा राहून पुन्हा सुरू होईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नव्या प्रकल्पासाठी लवकरच कर्जमंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक अहवाल वाचन करत असताना कार्यक्रम पत्रिकेतील विषयांवर सभासदांनी चर्चा केली. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

थोपटे म्हणाले, ‘‘कारखाना काही जणांना घशात घालण्यासाठी बंद पाडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. कर्मचाऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध असल्याचे सांगत, त्यांच्यासमोर ऐतिहासिक संघर्षाचे उदाहरण ठेवले.

नव्या प्रकल्पाला मोठा खर्च येणार असल्याने अडचणी असल्या, तरी त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प खासगी उद्योगाशी संबंधित नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यामुळे प्रकल्प उभारणीसाठी कर्जमंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या अटींबाबत शासनाच्या मार्गदर्शनाची अपेक्षा

कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने आगामी निवडणुकीच्या पात्रतेचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. क्रियाशील व अक्रियाशील सभासदांसाठी शासनाने निकष निश्चित केले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी सलग तीन वर्षे ऊस उत्पादक सभासद असण्याची अट आहे. मात्र, कारखाना सलग चार वर्षे बंद असल्याने या नियमांत बदल करण्याची गरज असल्याचे थोपटे यांनी नमूद केले. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सभेला उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य आणि सभासद उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »